
जुन्नरच्या आदिवासी भागात आपत्ती निवारण प्रशिक्षण
जुन्नर, ता. २५ : जुन्नरच्या आदिवासी भागातील नागरिकांना वर्षभर विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. यात अतिवृष्टी, वादळे, वन्य प्राण्यांचे हल्ले, सर्पदंश तसेच रस्ते अपघातासारख्या आपत्तीचा समावेश असतो. यासाठी आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी याविषयी शिवनेरी ट्रेकर्स व चाईल्डफंड इंडिया संस्थेच्या पुढाकारातून पहिल्या टप्प्यात आठ गावांतील नऊ शाळांतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
या अभियानांतर्गत उंडेखडक, निमगिरी, तळेरान, करंजाळे, सितेवाडी, खिरेश्वर, पिंपळगावजोगा, अलदरे या गावांतील प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच आश्रमशाळांमध्ये आपत्ती निवारण टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. दहा ते सोळा वयोगटाच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. या शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रथमोपचार साहित्य, आपत्ती पूर्वसूचना यंत्रणा, स्ट्रेचर आदी साहित्य पुरविण्यात येत आहे.
प्रशिक्षणाचे नियोजन चाइल्ड फंड इंडिया संस्थेचे प्रकल्प प्रमुख अभिजित मजने यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कांबळे यांनी केले होते. शिवनेरी ट्रेकर्सचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक संतोष डुकरे, नीलेश खोकराळे, सागर चव्हाण, सुभाष कुचिक, अनिल काशीद, अक्षय तांबे यांच्या प्रशिक्षक पथकाने विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या आपत्तींचा सामना कसा करावा याचे धडे दिले. या वेळी पिंपळगाव जोगा येथील संत गाडगे महाराज विद्या निकेतनचे मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.
जुन्नर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयात आपत्ती निवारण साहित्य व प्रशिक्षण देणार असल्याची माहिती प्रशिक्षक व शिवनेरी ट्रेकर्सचे सचिव संतोष डुकरे यांनी दिली.
या प्रशिक्षणातून त्यांना आपत्ती येवू नये म्हणून काय करावे, आपत्तीचा सामना कसा करावा, आणीबाणीची परिस्थिती कशी हाताळावी या विषयी सखोल मार्गदर्शन केले.