
वायरमनच्या मृत्यूप्रकरणात वीज कंपनीच्या चौघांवर गुन्हा
जुन्नर, ता. १८ : पिंपळगाव सिद्धनाथ (ता. जुन्नर) येथील स्थानिक सहायक वायरमनच्या मृत्यूप्रकरणी विद्युत वितरण कंपनीच्या चौघांविरुद्ध जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यात जुन्नर विभागाचे अधिकारी व कर्मचारी असल्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.
विद्युत खांबावर काम करत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने सोमनाथ युवराज खंडागळे याचा शुक्रवारी (ता. १७) दुपारी मृत्यू झाला होता. या घटनेने स्थानिक रहिवासी संतप्त झाले होते व त्यांनी विद्युत वितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. याबाबत सोमनाथ याचा भाऊ स्वप्नील युवराज खंडागळे याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विद्युत वितरण कंपनीचे जुन्नर विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ वायरमन वाळकू पारू मोरे, उपकेंद्र सहायक कुंडलिक नामदेव तळपे, उपकार्यकारी अभियंता आनंद एकनाथ घुले, कनिष्ठ इंजिनिअर कृष्णा मल्लापा कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वायरमन वाळकु मोरे याने बोलवल्याने सोमनाथ हा नेहमीप्रमाणे सकाळी कामावर गेला होता. दुपारी विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने त्याचा खांबावरच मृत्यू झाला. दुरुस्तीचे काम परमीट घेऊन सुरू केले होते. दुरुस्तीसाठी मोरे यांनी खांबावर चढणे आवश्यक होते. कामाचे परमीट पुन्हा जमा झाले नसताना वीज प्रवाह सुरू केल्यामुळे उपकेंद्र सहायक कुंडलिक तळपे, तसेच उपकार्यकारी अभियंता आनंद घुले व ज्युनिअर इंजिनिअर कृष्णा कोळी यांची देखरेख व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असताना त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली नसल्याने सोमनाथ याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार पुढील तपास करत आहेत.