
जळवंडी येथे ग्रामसभेनंतर दोन गटांमध्ये धक्काबुकी
जुन्नर, ता. २ : जुन्नरच्या आदिवासी भागातील जळवंडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेनंतर दोन गटात भांडणे झाली. या प्रकरणी जुन्नर पोलिसांकडे परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. ग्रामपंचायतीने गावासाठी दिलेल्या पाण्याच्या दोन टाक्या घरी ठेवल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसान धक्काबुक्की, शिवीगाळ व लाथाबुक्याने मारहाण करण्यात झाले. दोनही फिर्यादीत विनयभंग झाल्याचे नमूद केले असल्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.
कांताबाई पांडुरंग मुकणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी रोहिदास कोंडीभाऊ मुकणे, हरिभाऊ काळू मुकणे, हनमंत हरिभाऊ मुकणे, सीताराम कोंडीभाऊ मुकणे, यशोदा हरिभाऊ मुकणे, सिंधूबाई हरिभाऊ मुकणे, राधाबाई कोंडीभाऊ मुकणे (सर्व रा. हिरडी-जळवंडी, ता. जुन्नर) यांच्याविरुद्ध मारहाण, शिवीगाळ व विनयभंग केल्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. यशोदा हनुमंत मुकणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी कांताबाई पांडुरंग मुकणे, संदीप पांडुरंग मुकणे, सुगंधा तुळशीराम मुकणे, कल्पना राजाराम मुकणे, राजाराम पांडुरंग मुकणे (सर्व रा. हिरडी) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
दरम्यान, माजी सरपंचाचे दोन्ही गट नेहमीच वाद करणारे असून, यापूर्वी दोन वेळा परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.