अपुऱ्या खेळण्यांमुळे मुलांच्या पदरी निराशा

अपुऱ्या खेळण्यांमुळे मुलांच्या पदरी निराशा

दत्ता म्हसकर : सकाळ वृत्तसेवा
जुन्नर, ता. २९ : जुन्नर नगर नगर पालिकेच्या जिजामाता उद्यानात मुलांसाठी असणारी खेळणी गर्दीच्या वेळी अपुरी पडत आहेत. यामुळे मुलांसह पालकांच्या पदरी निराशा पडत आहे.
उद्यानाची देखभाल व स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर असणारे मनमोहक कारंजे तसेच सीसीटीव्ही देखील बंद आहेत.

जिजामाता उद्यानात नादुरुस्त खेळणी एका बाजूला कोपऱ्यात ठेवण्यात आलेली आहेत. झाडांना केलेले ओटे तसेच बसण्याचे काही बाक तुटलेल्या अवस्थेत आहेत. विविध खेळणी, कारंजे, बगीचा, स्वच्छतागृह व वीजपुरवठा आदी सुविधा दिल्या आहेत. उद्यानातील घसरगुंडी, झोके, सी-सॉ, लहान मुलांसाठी किलबिल एक्स्प्रेस यासारख्या विविध खेळण्यांचा आनंद मुले घेताना दिसतात.

जिजामाता उद्यानात प्रवेशासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येत असून, ज्येष्ठ नागरिक व पाच वर्षांखालील बालकांना मोफत प्रवेश आहे. उद्यान ठेकेदाराला चालविण्यासाठी देण्यात आले आहे. उद्यानाची एकूण स्थिती पाहता उद्यानापासून मिळणारे उत्पन्न व खर्च पाहता नगरपालिकेला फारसा लाभ होत नसल्याचे चित्र आहे. विकास आराखड्यात उद्यानासाठी खासगी जागांवर आरक्षण टाकले आहे या जागा पालिकेने विकसित कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.

नवीन उद्यानाचा प्रस्ताव प्रलंबित
नगरपालिकेतर्फे नाला गार्डन संकल्पना राबविण्याची कार्यवाही सुरू आहे. नवीन उद्यानासाठी जागा मागणी प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. अर्थसंकल्पात उद्यान देखभाल दुरुस्तीसाठी सहा लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत नवीन उद्यानासाठी निधी मागणी प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपूर्वी जिजामाता उद्यानात लॉन बसविण्यात आली. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाची लॉन बसविल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रारी अर्ज केले. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी प्रांताधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे ठेकेदारास बिल अदा केले नाही. पाच महिने होऊनही लॉनची परिस्थितीत बदल झाला नसल्याने नागरिकांनी कर रूपाने दिलेले पैसे वाया गेले आहेत.
-मंदार किरण बुट्टे पाटील, नागरिक

उद्यानात सदाहरित वृक्ष, विविध फुलझाडे याची लागवड करून उद्यान अधिक आकर्षक कसे होईल. याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यादृष्टीने जमिनीचे संवर्धन करावे. पर्यावरण व वाढती लोकसंख्या गृहीत धरून शहराच्या मध्यभागी व दाट लोकवस्तीच्या ठिकाणी उद्याने करावीत.
- यश मस्करे, निसर्गप्रेमी नागरिक

उद्यानातील विविध झांडाची जोपासना करण्यात येत असून त्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. झाडांवर विविध पक्षी वास्तव्य करतात. झाडांसाठी ठिबक व तुषार सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
संदीप भोळे- मुख्याधिकारी

06820, 06818

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com