घसरलेल्या टक्क्याचा 
कोणाला होणार लाभ!

घसरलेल्या टक्क्याचा कोणाला होणार लाभ!

दत्ता म्हसकर : सकाळ वृत्तसेवा
जुन्नर, ता. १४ : जुन्नर विधानसभा मतदारसंघात सर्वत्र सुरळीत व शांततेत ५८.१६ टक्के मतदान झाले. गेल्यावेळी ६४.९१ टक्के मतदान झाले. प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले, मात्र देखील गेल्यावेळच्या तुलनेत ६.७५ टक्क्यांनी मतदानाचा टक्का घसरल्याचे स्पष्ट झाले. त्याचा फटका कोणाला बसणार आणि लाभ कोणार होणार, याची आता उत्सुकता आहे.
जुन्नर तालुक्यात एकूण मतदारांची संख्या ३ लाख १२ हजार २०५ इतकी होती. यात पुरुष मतदार १ लाख ५९ हजार ८३०, महिला १ लाख ५२ हजार ३७१ व इतर ४, असे मतदार होते. एकूण १ लाख ८१ हजार ५८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ५८.१६ टक्के मतदान झाले. यात १ लाख ४५७ पुरुष मतदारांनी, तर ८१ हजार १५६ महिला व इतर एक मतदारांचा समावेश आहे. पुरुष मतदारांची टक्केवारी ६२.८३ व महिला मतदारांची ५३.२६ इतकी आहे. महिला मतदारांची टक्केवारी घटली आहे.
तालुक्यातील १५६ मतदानकेंद्रावर झालेल्या मतदानात टेंडर, तसेच चॅलेंज व्होट नोंदविले गेले नाही. तालुक्यातील उसरान येथील ७२ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर सर्वात जास्त ७८.६८ टक्के मतदान झाले. त्याखालोखाल मोकासबाग येथील २२५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर ७७.९९ टक्के व कुमशेत येथील १३० क्रमांकाच्या केंद्रावर ७७.४५ टक्के मतदान झाले. जुन्नर शहरातील १५७ क्रमांकाच्या केंद्रावर सर्वात कमी ४१.४९ टक्के मतदान नोंदविले गेले आहे. तालुक्यातील सुमारे दहा केंद्रावर ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे.
राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती, प्रचाराचा घसरलेला दर्जा यामुळे मतदारांत मतदानाविषयी असलेल्या निरुत्साहाचा परिणाम टक्केवारी घटण्यात झाल्याचे बोलले जाते. जत्रा- यात्रांसाठी महिला वर्ग माहेरी, तर शिक्षणासाठी परगावी असलेला विद्यार्थी वर्ग मतदान करू शकला नाही.

पावसाचा फटका
तालुक्यात पहिल्या दोन तासात ५.४९ टक्के, नंतरच्या प्रत्येक दोन तासात अनुक्रमे १७.०६,१९.७६,४१.३८, ५१.४७ अशा वाढत्या श्रेणीने मतदान झाले. मात्र, शेवटच्या टप्प्यात तालुक्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे मतदाराने घराबाहेर पडणे टाळले. अवकाळीच्या जोडीला विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने मतदानासाठी दुपारनंतर मोठ्या संख्येने आलेल्या मतदाराला मनस्ताप सोसावा लागला. कर्मचाऱ्यांना अपुऱ्या प्रकाशात काम करावे लागले.

आदिवासी भागात प्रतिसाद
तालुक्याच्या आदिवासी भागात चांगले मतदान झाले असले, तरी त्या तुलनेत सधन असलेल्या मध्य व पूर्व भागात कमी मतदान झाले आहे. तरुण मतदार उत्साहाने मतदानास बाहेर पडताना दिसत होते. दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा दिल्याने त्यांचे मतदान वाढण्यासाठी मदत झाली आहे. मतदान केंद्रावर येऊ न शकणाऱ्या ८५ वर्षांवरील ज्येष्ठ, तसेच दिव्यांग मतदारासाठी गृहभेट देऊन त्यांचे मतदान करून घेण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारच्या बुथच्या माध्यमातून तसेच सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून मतदारांना मतदानासाठी आकर्षित करण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश मिळाले. मतदार यादीतील नावे गायब होण्याच्या प्रकारचा मतदारांना मनस्ताप झाला. मतदान स्लीपचे वाटप व अचूक मतदार यादी यापुढील काळात निवडणूक विभागापुढे आव्हान राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com