वडजच्या ऑक्सिजन पार्कमध्ये दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन
जुन्नर, ता. १० : आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने ‘अत्यंत संकटग्रस्त’ म्हणून घोषित केलेल्या सोनघंटा व दहीमन या दुर्मिळ वनस्पतींचे वडज (ता. जुन्नर) येथील ‘ऑक्सिजन पार्क’मध्ये संवर्धन करण्यात येत आहे. माजी सैनिक वनरक्षक रमेश खरमाळे यांनी देशी वृक्षाबरोबर दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी दुर्मिळ वनस्पतींची रोपे मिळवून त्यांचे संवर्धन करण्याचे कार्य हाती घेतले आहे.
वडज धरणालगत पाटबंधारे विभागाच्या तीन एकर क्षेत्रात शिव मल्हार प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूर्व परवानगीने पर्यावरण प्रेमी खरमाळे दांपत्याचा ऑक्सिजन पार्क हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहे. येथे गेली वर्षभर खरमाळे दांपत्य स्वखर्चाने झाडांची जोपासना करून ती वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी स्वतः चार तळी खोदली आहेत. जलवाहिनीतून होणाऱ्या गळतीचे पाणी यात साठविण्यात येते. त्यानंतर हे पाणी बादलीने झाडांना देण्यात येते.
ऑक्सिजन पार्कमध्ये सुरुवातीला २०० रोपांची लागवड केली होती. येथे आतापर्यंत ५०० हून अधिक विविध देशी रोपांची लागवड केली आहे. यात वड, पिंपळ, मोहगणी, कडुनिंब, बकुळ, उंबर, बांबू अशा देशी रोपांचा समावेश आहे. या महिन्यात १५० हून अधिक तुळशीची रोपे लावली आहेत. येथे दहीमन वृक्ष लागवडीसाठी वसंत भिसेकर यांनी खरमाळे यांना दोन रोपे भेट दिली आहेत.
शिव मल्हार प्रतिष्ठाने उन्हाळ्यात झाडांना पाणी कमी पडल्याने एक हजार १०० फूट लांबीची जलवाहिनी टाकून पाण्याची व्यवस्था केली आहे. येथे लावलेल्या वृक्षांची अवघ्या १३ महिन्यात येथील झाडांची उंची १३ फुटांवर गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात वडज ऑक्सिजन पार्कचा आवर्जून उल्लेख केला आहे.
सोनघंटा या दुर्मिळ पुष्प वनस्पतीची पाने हृदयाच्या आकाराची, फुले नाजूक व पिवळसर- केशरी रंगाची, मखमली बीजकोश ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मानवी अतिक्रमणे, शेती आणि विकास कामे, वनक्षेत्रांचा नाश यामुळे या वनस्पतीवर नामशेष होण्याचा धोका वाढला आहे. या वनस्पतीचे संवर्धन करण्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग, जनजागृती आणि पर्यावरण शिक्षण आवश्यक आहे. धनंजय कोकाटे यांनी या वनस्पतीची प्रजाती वडज ऑक्सिजन पार्कमध्ये लावली आहे. ही वनस्पती फक्त पश्चिम घाटात, महाराष्ट्रात आढळते. या वनस्पतीचे संरक्षण करणे हे निसर्गाच्या शाश्वत भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. संवर्धनासाठी स्थानिक लोकांचा सहभाग, तसेच त्यांना वनस्पतीबद्दल माहिती देणे महत्त्वाचे आहे.
दहीमन औषधी वृक्ष
दहीमन एक दुर्मिळ प्रजातीचा औषधी वृक्ष आहे. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे व कमी संख्येमुळे हे झाड क्वचितच दिसते. दहीमन झाड पूर्णपणे नामशेष होऊ नये यासाठी सरकारकडून त्याचे संरक्षण केले जात आहे. ही औषधी वनस्पती जखमा बरे करणे, कामोत्तेजक आणि यकृत संरक्षणात्मक क्रियाकलापांसाठी प्रसिद्ध आहे. या झाडाची साल कर्करोग, कावीळ, मानसिक आजार, लठ्ठपणा, रक्तदाब आदींसाठी औषध म्हणून वापरली जाते. काही धार्मिक ग्रंथामध्ये दहीमनचे वर्णन केले आहे. तसेच, काही धार्मिक श्रद्धा देखील या झाडाशी संबंधित आहेत.
09144, 09145, 09146
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.