तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा थक्क करणारा प्रवास

तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा थक्क करणारा प्रवास

Published on

जुन्नर, ता. १२ : श्री तुळजाभवानी मातेचा श्रम निद्रेच्या पलंगाचा घोडेगाव (ता. आंबेगाव) पासून तुळजापूर पर्यंत होणारा पायी प्रवास थक्क करणारा आहे. यादव काळापासून तुळजापूरला जाणाऱ्या पलंगाच्या प्रवासाची परंपरा २१ व्या शतकातही अखंडपणे सुरू आहे.
घोडेगाव येथून दरवर्षी निघणारा तुळजाभवानी मातेचा पलंग सुमारे २२० किलोमीटर पायी प्रवास करतो. यासाठी किमान ५५ दिवसांचा कालावधी लागतो. पलंगाच्या शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या प्रवासात भाविक दहा ठिकाणी नदीपात्रातून पलंग पैलतीरावर नेतात.
पलंगाचा पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव या चार जिल्ह्यांतून प्रवास होतो. यात सर्वाधिक काळ पलंग जुन्नर तालुक्यात मुक्कामी असतो. संपूर्ण प्रवासात पलंगाचा १६ दिवसांचा मुक्काम जुन्नर तालुक्याच्या विविध गावात होत असतो. राजमाता जिजाऊ पलंगाच्या दर्शनासाठी जुन्नरला येतात. यामुळे तालुक्यात पलंगोत्सवाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
घोडेगावहून पलंगाचे प्रस्थान झाल्यानंतर जुन्नर तालुक्यातील निमदरी (१), जुन्नर (१०), कुमशेत (१), हापूसबाग(१), नारायणगाव (१), आळे (१), राजुरी (१) असा सोळा दिवसांचा मुक्काम आणि सुमारे ८० किलोमीटरचा प्रवास करून राहुरीहून पलंगाचे अहिल्यानगर मध्ये पदार्पण होते.
जुन्नर ते तुळजापूरपर्यंतच्या पायी प्रवासात दहा वेळा नदीपात्रातून पलंग नेताना अनेक आव्हाने असतात. परंतु भवानीमातेच्या कृपा आशीर्वादाने यात कोणतीही अडचण येत नाही, असे भाविक सांगतात.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथील कुकडी नदीपात्रातून, अहिल्यानगर ,बीड जिल्ह्यांच्या सीमा भागातून जाताना मेहकर नदीच्या पात्रातून सात वेळा पलंग पैलतीरी नेला जातो. आष्टी तालुक्यातील तलवार नदीतून, बार्शी तालुक्यातील नारी गावच्या बेडका नदीपात्रातून पलंगाचा प्रवास होतो. प्रत्येक वर्षी पलंगाचा प्रवास आजही नदीपात्रातून होत असल्याचे पलंगाचे मानकरी गणेश पलंगे यांनी सांगितले.
नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला भिंगार येथील मारुती मंदिरात मातेच्या सीमोल्लंघन पालखीची आणि श्रमनिद्रा पलंगाची ऐतिहासिक भेट होते. यानंतर सात दिवस अहोरात्र प्रवास करत नवव्या माळेस पलंग तुळजापूरला पोहोचतो. नवरात्रीनंतर या माहेरच्या लाकडी पलंगावर आश्‍विन शुद्ध दशमी (दसरा) ते आश्‍विन शुद्ध पौर्णिमा(कोजागरी पौर्णिमा) पर्यंत पाच दिवस माता निद्रा घेते. यास मंचकी निद्रा असे म्हणतात. पौर्णिमेला देवी पुन्हा सिंहासनावर येते. गेल्या वर्षीचा जुना पलंग होमामध्ये टाकला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com