जुन्नर तालुक्यात उद्या पोलिओ लसीकरण मोहीम
जुन्नर, ता. १० : पुणे जिल्हा परिषद व जुन्नर तालुका पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात रविवारी (ता. १२) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी कुळमेथे यांनी दिली.
तालुक्यातील ३१ हजार ८९२ बालकांना लसीकरण करण्याचे नियोजन केले असून, तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी ‘दोन थेंब जीवनाच- पोलिओमुक्त भविष्याचे’ हा संदेश व्यापकपणे देण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या शून्य ते पाच वयोगटातील बालकाला पोलिओ लसीकरण करून घ्यावे. तालुक्यात शून्य ते पाच वयोगटात ग्रामीण भागात २७ हजार ६९७ व शहरी भागात चार हजार १९५ बालके आहेत, असे डॉ. कुळमेथे यांनी सांगितले.
पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. यासाठी ऊसतोड, वीटभट्टी कामगार, एसटी बसस्थानक, जिल्ह्याच्या सीमा या ठिकाणी विशेष लसीकरण कक्ष स्थापन केले आहेत. पोलिओ लसीकरणासाठी ३५३ बूथ उभारले जाणार आहेत. यासाठी एकूण ७६४ आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहे. या मोहिमेअंतर्गत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना १४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत गृहभेटीद्वारे पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. तहसीलदार डॉ. सुनील शेळके व गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार यांनी या लसीकरण मोहिमेत जबाबदार पालक म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.