नाणेघाट लेणी प्रतिबंध क्षेत्रात बांधकाम; एकावर गुन्हा
जुन्नर, ता. १९ : घाटघर (ता. जुन्नर) जवळील नाणेघाट लेणीचे प्रतिबंध क्षेत्राच्या हद्दीत बांधकाम करणाऱ्या दोघांविरुद्ध प्राचीन स्मारके व पुराण जागा व अवशेष अधिनियम १९५५ चे कलम २० व३० (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
यमुनाबाई किसन रावते (रा. घाटघर, ता. जुन्नर), गणेश बबन सांगडे (रा. धालेवाडी तर्फे मिन्हेर ता. जुन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी अभिषेक कुमार राजकुमार पाल यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी सांगडे विरोधात यापूर्वी जुन्नर पोलिस ठाण्यात वेगवेगळे चार गुन्हे दाखल असल्याने प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे तर आरोपी रावते विरुद्ध सीआरपीसी १०७ प्रमाणे चॅप्टर केस करण्यात आली असल्याचे अवचर यांनी सांगितले. नाणेघाट लेणी स्मारक प्रतिबंधक क्षेत्रात भारतीय पुरातत्त्व विभागाची पूर्वपरवानगी न घेता भारतीय पुरातत्त्व संरक्षण प्रतिबंधित क्षेत्रापासून १०० मीटरमध्ये आरोपींनी हॉटेल कॉटेज बांधले असल्याचे निदर्शनास आल्याने पाल यांनी फिर्याद दिली आहे.