जुन्नर तालुक्यातील बिबट समस्या
सोडविण्यासाठी उपाययोजना करा

जुन्नर तालुक्यातील बिबट समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करा

Published on

जुन्नर, ता. ३० : ‘‘जुन्नर तालुक्यातील बिबट समस्या सोडविण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात,’’ अशी मागणी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे भारतीय किसान संघाच्यावतीने प्रशांत पाबळे यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन वनमंत्री गणेश नाईक तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. दिवसेंदिवस जुन्नर तालुक्यातील बिबट समस्या तीव्र होत आहे. यामुळे तत्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. यासाठी बिबट प्रवण प्रत्येक गावात एकाचवेळी पिंजरे लावून बिबट पकडण्यात यावेत. पकडलेले बिबटे दूर जंगलात नेऊन सोडावेत. शेतवस्ती, वाडी, मेंढपाळ तसेच ऊसतोड मजुरांची वास्तव्याची ठिकाणे निश्‍चित करावीत. येथील कुटुंबे तसेच पशुधन बिबट्यापासून सुरक्षित कसे राहील, याची दक्षता घेण्यात यावी तसेच त्या गावात पुन्हा दुसरे बिबटे येणार नाहीत यासाठी त्या जागी विशेष ड्रोन कॅमेऱ्याने लक्ष ठेवावे. बिबट राहत असलेल्या ठिकाणी असणारा त्यांचा वास जाईल, अशी उपाययोजना करावी. वनखात्याला तत्काळ एक हजार पिंजरे उपलब्ध करून द्यावेत. बिबट पकडणे, पिंजरे लावणे तसेच दूर नेऊन सोडणे यासाठी तालुक्यातील तरुणांची ठेकेदार पद्धतीने भरती करावी, वनविभागाकडून बिबट पकडण्याची मोहीम राबविण्यात यावी, अशी भारतीय किसान संघाचे वतीने मागणी केली आहे.
तालुक्यातील विघ्नहर साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी ऊसतोड मजुरांच्या टोळ्या तालुक्यात आल्या आहेत. ही कुटुंबे उघड्यावर कोपीत राहतात. त्यांची जनावरे देखील उघड्यावर असतात या मजुरांसाठीदेखील उपाययोजना राबवावी, असे पाबळे यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com