बंडखोरी टाळण्यासाठी जुन्नरला सावध भूमिका
जुन्नर, ता. १२ : नगर परिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊनही प्रमुख राजकीय पक्षांनी नगराध्यक्ष, तसेच नगरसेवकपदाचे उमेदवार जाहीर न केल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी पक्षप्रमुख उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक- दोन दिवस अगोदर उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
जुन्नरचे नगराध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. या प्रवर्गातून सर्वच राजकीय पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे. यात प्रामुख्याने विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे. उच्चशिक्षित महिला प्रथमच मोठ्या संख्येने राजकीय आखाड्यात उतरत असल्याचे चित्र आहे. राजकीय पक्षाच्या काही इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी निश्चित मानून मतदारांच्या गाठी भेटी घेण्यास सुरवात केली आहे. तसेच, प्रभागातील प्रमुख मान्यवरांच्या भेटी घेत आशीर्वाद मागत आहेत. याच बरोबर समाज माध्यमांतून देखील प्रचाराचा धुरळा उडवत आहेत.

