जुन्नरला बहुरंगी लढतीमुळे नेत्यांचा लागणार कस
दत्ता म्हसकर
जुन्नर, ता. १९ : नगर परिषद निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवार दिल्याने निवडणुकीत युती किंवा आघाडीची चर्चा फोल ठरली आहे. प्रभागातून दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढत होत आहेत. बहुरंगी लढतीमुळे राजकीय नेतृत्वाचा कस लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या विभाजनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत पक्षाचा प्रभाव दाखविण्यासाठी नेतृत्वाचा कस लागणार आहे. राजकीय बलाबल, धर्म-जातीची समीकरणे, उमेदवारांची वैयक्तिक प्रतिमा, आर्थिक क्षमता व नेतृत्व या मुख्य घटकांचा प्रभाव निवडणुकीत राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वप्रथम नगराध्यक्ष व सर्व सदस्यांची यादी जाहीर करत आघाडी घेतली. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला. उमेदवारांची यादीदेखील प्रसिद्ध केली. आघाडीतील काँग्रेस पक्षाने मात्र ‘एकला चलो’ची भूमिका घेत अखेरच्या टप्प्यात नगराध्यक्ष व काही सदस्यपदाचे उमेदवार दिले. भाजप- शिवसेनेची युती होत असल्याचे जाहीर झाले, मात्र दोन्ही पक्षांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिल्याने युतीबाबत शंका निर्माण झाली आहे. शिवसेनेने नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी उमेदवार दिले आहेत. अधिकृत यादी अद्याप जाहीर केली नाही.
जुन्नर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या तुलनेत अन्य पक्षांची ताकद तुलनेत कमी आहे. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस हा एकच पक्ष नगराध्यक्ष व सर्व सदस्यांसाठी उमेदवारी देऊ शकला आहे. नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी इच्छुक असलेल्यांना डावलले गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील काहींनी बंडखोरीचा मार्ग अनुसरला. हीच परिस्थिती शिवसेना व भाजपमध्ये झाली. उमेदवारी डावलण्यात आल्याने उमेदवारांच्या शोधात असलेल्या अन्य पक्षाना आयते उमेदवार मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधक प्रयत्न करणार असल्याने माजी आमदार अतुल बेनके यांचा कस लागणार आहे. त्यांच्या विरोधात मशाल व तुतारीची आघाडी, तसेच भाजप, शिवसेना कसे डावपेच आखणार, यावर निकालाची गणिते अवलंबून राहतील.
भाजप नेत्या आशा बुचके यांनी शहरात भाजपला अस्तित्व देण्याचा प्रयत्न करताना नगराध्यक्ष व सात सदस्य उमेदवार दिले आहेत. तसेच, निवडून येण्याची क्षमता पाहून युती करणार असल्याचे म्हटले आहे.
शहरात मुस्लीम मतदारांची संख्या आठ ते नऊ हजार आहे. त्याखालोखाल ओबीसी मतदारांची संख्या आहे. आमदार शरद सोनवणे यांनी मागील निवडणुकीत आपला माणूस आपली आघाडीच्या माध्यमातून नगर परिषदेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेची सत्ता राहील, अशी व्यूह रचना ते करत आहेत. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांचा इतिहास पाहता नगराध्यक्ष एका पक्षाचा, तर राजकीय बलाबल दुसऱ्या पक्षाचे, अशी स्थिती राहिली आहे. या निवडणुकीतही वेगवेगळ्या पक्षांचे कमी अधिक नगरसेवक निवडून येऊन जुन्नरचा कारभार चालेल, अशी चर्चा आहे.
नगराध्यक्ष तसेच दहा प्रभागांमधील २० जागांसाठी निवडणूक होत आहे. एकूण २३ हजार ५१५ मतदारांपैकी महिला मतदार ११ हजार ६९८ व पुरुष मतदार ११ हजार ८१७ आहेत.
मागील पक्षीय बलाबल :
नगराध्यक्ष- शिवसेना
राष्ट्रवादी काँगेस -८, काँग्रेस- १, शिवसेना- ५, आपली आघाडी- ३.
नगराध्यक्ष आरक्षण- ओबीसी महिला प्रवर्गसाठी राखीव
प्रचाराचे मुख्य मुद्दे
- माणिकडोह धरणातून पाणी पुरवठा योजनेचे अपूर्ण काम
- भाजी बाजारासाठी एकच व्यवस्था
शहरातील प्रमुख प्रश्न
- पावसाळ्यात रस्त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी
- भूमिगत गटर योजना, भटकी जनावरे
- अतिक्रमणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

