
रानडुकराच्या हल्ल्यात शिवरीत ज्येष्ठ जखमी
खळद, ता. १० : शिवरी (ता. पुरंदर) येथे मदनझळा परिसरामध्ये लोकवस्तीमध्ये रानडुकराने हल्ला केला. त्यात येथील अंकुश रामचंद्र आरडे (वय ६५) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर ससून येथे उपचार करण्यात आले.
सोमवारी (ता. ९) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास परिसरामध्ये कुत्री भुंकण्याचा आवाज आल्याने आरडे हे उठून बाहेर आपल्या गाईच्या गोठ्यात पाहायला गेले असता पाठीमागून रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. याबाबत वन विभागाच्या वतीने परिंचे विभागाचे वनपाल अनिल खोमणे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठवण्याचे सांगितले. मात्र, शेतकऱ्यांचे याच्यावर समाधान झाले नसून, आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठवले, मात्र नुकसान भरपाई मिळण्यास दिरंगाई होते; तर मिळणारी रक्कमही नुकसानीच्या पटीत अगदी तुटपुंजी असल्याचे शेतकरी नाराज आहेत.