नागरिकांचा खडतर, खड्डेमय प्रवास सुरूच

नागरिकांचा खडतर, खड्डेमय प्रवास सुरूच

Published on

खळद, ता. २० : खळद (ता. पुरंदर) येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून गोटेमाळ ते बोऱ्हाळवाडी रस्ता सुधारण्याचे सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून काम डिसेंबर २०२३ ला सुरू झाले अन् अर्धवट अवस्थेत बंद पडले. यामुळे रस्ता मंजूर होऊनही अर्धवट कामामुळे रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचले आहे. सर्वत्र खडी उघडी पडल्याने येथील नागरिकांचा खडतर, खड्डेमय प्रवास सुरू आहे.
या कामाचा निर्धारित कालावधी हा १७ सप्टेंबर २०२४ रोजी संपला असून, या रस्त्याच्या सुरुवातीला याबाबत काम पूर्णत्वाची तारीख दर्शविणारा फलक ही लावला आहे. मात्र, प्रत्यक्षात काम हे अर्धवट असून, डांबरीकरण सोडा पण प्रत्यक्षात मात्र आता काही ठिकाणी खडी, मुरूमही दिसत नाही. यामुळे हा फलक पाहिल्यावर नागरिकांना रस्ता, डांबरीकरण चोरीला गेले की काय? असा प्रश्न पडू लागला आहे.
रस्त्यावर दिसणारा फलक हा खुला असून, या कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांना हा फलक व यावरील तारीख अद्यापपर्यंत लक्षात आली नाही का? काम पूर्ण होण्यास कोणत्या अडचणी आहेत? ठेकेदाराने निर्धारित कालावधीमध्ये काम पूर्ण केले नाही तर याबाबत शासनाच्या वतीने काही पत्रव्यवहार झाला आहे का? या कामासाठी शासनाकडून निधी अडवला जात आहे का? शासनाकडे निधी नसल्यास हे काम आहे याच अवस्थेत असेच बंद राहणार का? संबंधित ठेकेदाराला हे काम करता येत नसेल तर पुन्हा नवीन ठेकेदाराची नेमणूक होणार का? ग्रामपंचायत याकडे लक्ष देणार का? असे वेगवेगळे प्रश्न येथील नागरिकांना पडत आहेत.

गोटेमाळ ते बोऱ्हाळवाडी रस्ता
अंतर - १.७० किलोमीटर
खड्डे संख्या- खडीमय
मागील तीन वर्षातील निधी - १ कोटी २४ लाख ८० हजार

या रस्त्यावरून प्रवास करत असताना ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुले, दुचाकी स्वार, माल वाहतूक करणारे शेतकरी यांना खड्डेमय प्रवासाचा त्रास होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करावे.
- महादेव जाधव, स्थानिक रहिवासी.

पावसामुळे रस्त्याचे काम बंद ठेवले आहे. पाऊस उघडल्यावर दसऱ्यानंतर लगेच काम सुरू करू. नागरिकांच्या मागणीनुसार जुन्या झालेल्या कामांमध्ये पडलेले खड्डे, उखडलेली खडी, साइडपट्टीची झालेली दुरवस्था या सर्व बाबी पूर्ण करूनच नंतर पुढील कामाला सुरुवात करू.
- प्रशांत पवार, शाखा अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक विभाग.

03251

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com