खळदला ओढ्यावर बांधला वनराई बंधारा
खळद, ता. ७ : खळद (ता. पुरंदर) येथील श्री शिवशंभो माध्यमिक विद्यालयातील क्रांतिवीर स्काउट पथक व सावित्रीबाई फुले गाइड पथक यांच्या वतीने येथील चव्हाण वस्ती नजीकच्या ओढ्यावर श्रमदानातून वनराई पद्धतीने बंधारा बांधून पाणी अडविण्याचा अभिनव उपक्रम राबविला.
शाळकरी मुलांनी उभारलेल्या या कामातून येथे पाणी साठवण होणार असून, यातून परिसरात भूजल पातळी वाढण्यास मदत होईल व शेतकऱ्यांना याचा शेती पिकासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा मोलाचा आधार मिळणार असल्याने या मुलांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे, यासाठी साहाय्य करणाऱ्या दात्यांचे विशेष कौतुक होत आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ टापरे यांच्या मार्गदर्शनातून स्काउट मास्टर रमेश बोरावके यांच्या संकल्पनेतून व उत्कृष्ट नियोजनातून इयत्ता पाचवी ते आठवी स्काउट गाइड यांनी सिमेंटच्या पिशव्यांत माती वाळू भरून बंधारा बांधला.
‘‘पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी वाहणारे पाणी अडविले पाहिजे, अडलेले पाणी मुरविले पाहिजे, मुरलेले पाणी विहिरीत जाऊन पिकाला मिळाले पाहिजे हा या बंधाऱ्याचा मुख्य उद्देश आहे,’’ असे रमेश बोरावके यांनी सांगितले.
हा बंधारा बांधण्यासाठी पिशव्यांचे सौजन्य माजी सरपंच दशरथ कादबाने, सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी कादबाने यांनी केले, तर स्काउट गाइडला यासाठी लागणारे साहित्य खोरे, घमेली, सुतळी, दाभण व अल्पोपाहार नजीकचे शेतकरी किशोर चव्हाण, राजेंद्र चव्हाण, कुंडलिक रासकर यांच्या वतीने देण्यात आले.
हे शिबिर यशस्वीपणे राबविण्यासाठी दिलीप जगताप, प्रल्हाद कारकर, रामचंद्र कामठे, सायली गोरे, सुस्मिता चव्हाण, प्रकाश हांडे, वैजयंता मांढरे, बाळासाहेब खळदकर, बाबूराव गायकवाड यांनी केले.
‘पाणी आडवा-पाणी जिरवा’ मोहीम ही मोहन धारिया यांच्या संकल्पनेतून साकार झालेली अभिनव योजना शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. हिवाळ्यात नदी नाले कोरडे पडत असताना तात्पुरत्या स्वरूपात या बंधाऱ्यांची निर्मिती केली जाते यामुळे शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात पाणी कमी पडते. या वेळी एक आवर्तन पिकांना या वनराई बंधाऱ्यामुळे सहज मिळू शकते व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठीही मदत होते.
- हरिभाऊ टापरे, मुख्याध्यापक श्री शिवशंभो माध्यमिक विद्यालय

