‘पांडुरंगा’चा गावात मुक्काम असुनही अवैध धंदे थांबेना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पांडुरंगा’चा गावात मुक्काम असुनही अवैध धंदे थांबेना!
‘पांडुरंगा’चा गावात मुक्काम असुनही अवैध धंदे थांबेना!

‘पांडुरंगा’चा गावात मुक्काम असुनही अवैध धंदे थांबेना!

sakal_logo
By

कडुस, ता. ६ ः कडुस (ता. खेड) येथे पाच दिवसांसाठी पंढरपूरचा पांडुरंग वास्तव्यास आल्याने गावात पांडुरंग उत्सव सुरू आहे. एका बाजूला गावात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला अवैध धंद्यांची बिनदिक्कत जोरदार चलती आहे. यामुळे देवदर्शनासाठी बाहेरगावावरून आलेल्या महिला भाविकांची कुचंबणा होत असून, गावातील बेकायदेशीर धंद्यांबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

कडुस येथे माघ शु. दशमी ते माघ शु. पौर्णिमा या कालावधीत पंढरपूरचा पांडुरंग वास्तव्यास येत असल्याची समस्त वारकरी संप्रदायाची धारणा असल्याने सध्या गावात पांडुरंग उत्सवाची धामधूम सुरू आहे. संत तुकाराम महाराजांच्या १४ टाळकऱ्यांपैकी एक कडूसच्या गंगाजीबुवा मवाळ यांनी स्वहस्ते लिहिलेली तुकाराम महाराजांच्या अभंगाची अभंगगाथा व मंदिरातील चारशे वर्षांपूर्वीच्या राही-रखुमाईच्या पितळी मूर्तीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत आहेत. उत्सवामुळे गावात वारकरी भाविक भक्तांची मांदियाळी आहे. गावात भक्तिमय वातावरण आहे. मंदिर परिसर गर्दीने फुलला आहे. गावात एवढा मोठा धार्मिक उत्सव सुरू असताना बेकायदेशीर दारू विक्री व जुगार अड्ड्याचीसुद्धा धूम सुरू आहे. झिंगलेल्या अवस्थेतील मद्यपी भाविकांच्या दृष्टीस पडत असल्याने भविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच स्पिरीटची घरगुती बनावटीची दारू मिळत असल्याची दबक्या आवाजात चर्चा मद्यपीमंध्ये आहे. अवैध धंद्यांची चलती असताना पोलिस कारवाईबाबत नागरिकांची नाराजी आहे. कारवाई झालीच तरी माहिती उघड केली जात नसल्याने कारवाई फक्त वरिष्ठांच्या मर्जीसाठी कागदोपत्री रंगवली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.