दोंदेतील तिरक्या पुलावर अपघाताचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोंदेतील तिरक्या पुलावर अपघाताचा धोका
दोंदेतील तिरक्या पुलावर अपघाताचा धोका

दोंदेतील तिरक्या पुलावर अपघाताचा धोका

sakal_logo
By

कडूस, ता. २७ : दोंदे (ता.खेड) येथे कडूस मार्गावरील ओढ्यावर नवीन पुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. पण पुलाचे बांधकाम मूळ रस्त्याला तिरके झाले आहे. पुलाच्या दोन्ही बाजू मूळ रस्त्याला व्यवस्थित व सरळ जोडली जात नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच शासकीय रकमेचा घोळ करण्यासाठी आराखड्यापेक्षा पुलाची लांबी कमी केल्याचा संशय ग्रामस्थ करीत आहेत.

दोंदे येथील ओढ्यावर सुमारे एक कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असलेल्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु हा पूल मूळ रस्त्याला तिरका झाला आहे. दोन्ही बाजूचा रस्त्याला जोडणारा पुलाचा भाग सरळ व व्यवस्थित जोडला जात नसल्याचे साध्या नजरेत भरत आहे. पुलाच्या मागणीसाठी सरपंच चंद्रकांत बारणे यांच्यासह ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता. परंतु हा पूल तिरका बांधला गेल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला अगोदरच रस्त्याला वळणे होती, त्यात पूल पण तिरका झाल्याने ही वळणे आणखी तीव्र व मोठी झाली आहेत. तिरक्या पुलामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यातच दोन्ही बाजूला पुलापासून काही अंतरावर रस्त्याला उंचवटा आहे. पूल उंच तर लगतच्या दोन्ही बाजू खोलगट झाल्या असून अप्रोच रस्त्याचा भराव वाढविण्याची मागणी ग्रामस्थांची आहे.
कडूस व दोंदेच्या पुलासाठी अर्थसंकल्पीय फंडातून अडीच कोटीची तरतूद करण्यात आली होती. त्यातील एक कोटींचा निधी या पुलासाठी असल्याचे अधिकारी सांगतात.
दरम्यान, शाखा अभियंता शरद मोटे म्हणाले, ''मी आताच कामावर येथील . मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुलाचे काम दाखवणार आहे.''


अफरातफर करण्याचा इरादा
पुलासाठी मुबलक निधी होता. परंतु ठेकेदारावर मेहेरनजर दाखविण्यासाठी व एकमेकांपासून दूरवर असलेल्या दोन्ही पुलाचा निधी एकबंध करून आर्थिक घोळ करण्यासाठी आराखड्यापेक्षा पुलाची लांबी कमी केल्याने पूल मूळ रस्त्याला तिरका झाल्याचा ग्रामस्थांचा संशय आहे. यात मोठी अफरातफर करण्याचा अधिकारी व ठेकेदाराचा इरादा असल्याचे काही ग्रामस्थांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले.

दोन्ही बाजूने शेतकरी आहेत. त्यांचा विरोध होता. तरीही पूल जेवढा सरळ करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला आहे.
- धनराज दराडे, बांधकाम विभागाचे तत्कालीन शाखा अभियंता


00984