शेवटी वाढलेला टक्का
कोणाला पडणारा भारी

शेवटी वाढलेला टक्का कोणाला पडणारा भारी

महेंद्र शिंदे : सकाळ वृत्तसेवा
कडूस, ता. १४ : शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड- आळंदी विधानसभा मतदार संघात एकूण ५७.८१ टक्के मतदान झाले. तालुक्यात नागरिकांच्या तोंडात ‘तुतारी’चा आवाज घुमत असला, तरी ‘घड्याळा’ची टिकटिक पण टिकून असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मतदारांनी कोणाला पसंती दिली, हे औत्सुक्याचे ठरणार आहे. मतदानाच्या अखेरच्या तासाभरात वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला ‘भारी’ पडतोय, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.

शिरूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक नवीन असली तरी दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार जुनेच आहेत. लढत जुन्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये असली तरी पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जे मागच्या वेळी ज्याला हरवायला निवडणूक रिंगणात होते, तेच आता त्याला जिंकून देण्यासाठी मैदानात उतरल्याचे चित्र होते. अचानक बदललेल्या भूमिका अनेक मतदारांना रुचल्या नाहीत. या बदललेल्या भूमिकांचा आपापल्या पद्धतीने निष्कर्ष काढून मतदार मतदानाला गेले.
खेड तालुक्यातील महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या गावातील मतदानाची टक्केवारी चांगली राहिली. मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्यात त्यांना यश आले. अचानक बदललेल्या राजकीय भूमिका, कांदा निर्यात बंदी, सोयाबीनसह शेतमाल व खतांचा बाजारभाव, शेतकऱ्यांची सरकार विरोधी नाराजीच्या मुद्द्यांवर एका बाजूने मतदान काबीज करण्याचा प्रयत्न झाला, तर दुसऱ्या बाजूने विकास कामे, मतदारांशी दुरावा आदी मुद्यांचा वापर झाला. महायुतीकडून आमदार दिलीप मोहिते यांच्या कार्यकर्त्यांनी प्रमुख भिस्त सांभाळली, तर महाविकास आघाडीच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी खिंड लढवली.

पैसे वाटपाची चर्चा
मतदान केंद्रावर पोचलेल्या तालुक्यातील बहुतांश ठाकर वस्त्यांवरील मतदारांना पाचशे रुपयांप्रमाणे पैसे वाटपाचा गवगवा झाला. याबाबतचा एक चित्रफीतसुद्धा उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतः सोशल मीडियावर ट्विट केली होती. या पैसे वाटपाचा परिणाम मतमोजणीत निश्चित दिसणार आहे. तालुक्यातून ‘तुतारी’ला मताधिक्य मिळेल, असा जाणकारांचा होरा आहे, पण मतदानाच्या शेवटच्या तासाभरात मतदानाची टक्केवारी अचानक वाढली. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसले. मतदानाच्या शेवटच्या तासाभरात वाढलेला मतदानाचा टक्का ‘तुतारी’चे मताधिक्य कमी करेल, अशी शक्यता आहे.

महिलांचा टक्का घसरला
खेड तालुक्यातील ३ लाख ५२ हजार ३६४ मतदारांपैकी २ लाख ३ हजार ८६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १०पैकी २ तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले. एकूण मतदानात पुरुषांपेक्षा महिलांची टक्केवारी खूपच कमी राहिली. एकूण पुरुष मतदारांपैकी ६३.४३ टक्के पुरुषांनी मतदान केले, तर फक्त ५१.७४ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. १ लाख ६९ हजार ५६७पैकी ८७ हजार ७३६ महिलांनी मतदानात सहभाग नोंदवला. त्यातून महिलांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवल्याने वास्तव उघडे झाले.

राजगुरुनगर शहरासह तालुक्यातील मोठी शहरे व तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये महायुतीला चांगले मतदान झाले आहे. तालुक्यातून कमीत कमी वीस हजाराचे मताधिक्य ‘घड्याळा’ला मिळेल, हा विश्वास आहे.
- कैलास सांडभोर, खेड तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

तालुक्यातील सर्वसाधारण चर्चेनुसार ऐंशी टक्के मतदारांचा आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिसत होता. परंतु, पैशांचे आमिष मतदारांना दिले. लोकशाहीच्या प्रथेनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळेल.
- रामदास धनवटे, खेड तालुकाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com