गारगोटवाडीची विशेष ग्रामसभा अचानक स्थगित

गारगोटवाडीची विशेष ग्रामसभा अचानक स्थगित

Published on

कडूस, ता. १८ : खाणपट्टा व खडी क्रशर व्यवसायासाठी गारगोटवाडी (ता. खेड) ग्रामसभेने यापूर्वीच नाकारलेल्या ‘ना हरकत’ दाखल्याची खातरजमा करण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाने व्यावसायिकाच्या बाजूने हस्तक्षेप करीत गुरुवारी (ता. १८) विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. परंतु, ही ग्रामसभा अचानक स्थगित केली. जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती समितीच्या आढावा बैठकीला उपस्थित राहणे बंधनकारक असल्याने ग्रामसभा पुढे ढकलण्यात आली आहे, असे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी ग्रामस्थांना बुधवारी (ता. १७) पत्राद्वारे कळवले.
​गारगोटवाडी येथे स्टोन क्रशर व्यवसाय, सुरुंग उडवून खाणकाम करणे, डांबर प्लांट, डिझेल व ऑइलचा साठा करणे, आरएमसी प्लांट, सोलर प्लांटसाठी एका व्यावसायिकाने ग्रामपंचायतीकडे ‘ना हरकत’ दाखल्यासाठी अर्ज केला होता. परंतु ग्रामसभेने यासंदर्भात यापूर्वीच केलेल्या ठरावाच्या आधारावर ग्रामपंचायतीने हा दाखला देण्यास नकार दिला. यावर व्यावसायिकाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाद मागितली. जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष ग्रामसभा घ्यावी, असे खेड महसूल विभागाला कळविले. यानुसार खेडचे उपविभागीय अधिकारी दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता गावातील हनुमान मंदिरात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. पूर्वीचा ग्रामसभेचा ठराव असताना प्रशासनाने पुन्हा त्याचसाठी ग्रामसभा आयोजित केल्याच्या मुद्द्यावरील उलटसुलट चर्चेने गाव ढवळून निघाले आहे. कायद्यातील तरतूद दर्शवून जिल्हाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या निर्णयावर हस्तक्षेप, व्यावसायिकाचा गावातील वावर व गावातील काही लोकांशी त्यांची सलगी यावर चर्चेला गेल्या आठ दिवसांपासून पंचक्रोशीत उधाण आले आहे.
या सर्व प्रकारामुळे गावातील सर्वसामान्य ग्रामस्थ, महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तरीही गावातील तरुण व महिलांच्या मदतीने ग्रामसभेला सामोरे जाण्याचा तयारी ज्येष्ठ नागरिकांनी केली होती. परंतु, ही ग्रामसभा स्थगित केल्याचा निरोप ग्रामस्थांना बुधवारी रात्री उशिरा अचानक समजला. महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती समिती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या समितीची आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.
या बैठकीला उपविभागीय अधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असल्याच्या कारणावरून ग्रामसभा स्थगित केल्याची सूचना ग्रामस्थांना बुधवारी रात्री उशिरा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. याबाबत उपविभागीय अधिकारी दौंडे यांनी पत्राद्वारे ग्रामस्थांना कळवले आहे. ग्रामसभा पुढे ढकलण्यात आली असून, ग्रामसभेची पुढील तारीख यथावकाश कळविली जाईल, असेही पत्रात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com