अनधिकृत रोहित्रांसाठी महावितरणची मोहीम
कडूस, ता. ३० : खेड तालुक्यातील रोहित्रांच्या वाढत्या चोरीच्या घटना व त्याच्या अनधिकृत साठ्याची बाब ‘महावितरण’ने गांभीर्याने घेतली आहे. साठ्यांचा शोध घेण्यासाठी महावितरणने मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती महावितरण पुणे परिमंडलचे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांनी कळविले आहे.
तालुक्यातील रोहित्र चोरी, पोलिस तपास व एमआयडीसी भागात कंत्राटदारांचे काळे कारनामे यावर ‘सकाळ’ने सलग तीन दिवस प्रकाशझोत टाकला होता. याची महावितरणने गांभीर्याने दखल घेतली आहे. परस्पर रोहित्र बदलणे ही बाब गंभीर आहे. खेड तालुक्यात असा प्रकार कुठे झाला आहे का? याची माहिती घेतली जात आहे, असे महावितरणने कळविले आहे. परंतु अशा प्रकारची कोणतीही तक्रार अद्याप राजगुरुनगर महावितरण विभागास प्राप्त झालेली नाही. जेव्हा एखादे विद्युत रोहित्र वारंवार नादुरुस्त होते, त्या प्रत्येक वेळी महावितरणकडून त्या रोहित्राची क्षमता व त्यावरील जोडभाराची शहानिशा केली जाते. त्यानंतरच ते बदलले जाते.
खेडच्या ग्रामीण भागामध्ये रोहित्र चोरीच्या घटना अधूनमधून घडत आहेत. त्या प्रत्येक वेळी महावितरणकडून पोलिसांत फिर्याद नोंदविली जात आहे. पोलिसांनीही अनेकदा रोहित्रांची चोरी करणाऱ्या टोळ्या पकडल्या आहेत. रोहित्र चोरीच्या घटना टाळण्यासाठी महावितरणकडून रात्रीची गस्त घालण्यात येत आहे. तसेच रोहित्राच्या सुरक्षेसाठी वेल्डिंग सुद्धा केले जात असल्याची खबरदारी घेतली जात आहे. २०२३ मधील घटने सहभागी असलेल्यांच्या विरोधात तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केलेली आहे. रोहित्रांच्या अनधिकृत साठ्याबाबतही महावितरण सतर्कता बाळगून आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महावितरणकडून सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणचे राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी यांनी कळविले आहे.

