खडकवासला कालव्याचे आवर्तन मृगजळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खडकवासला कालव्याचे आवर्तन मृगजळ
खडकवासला कालव्याचे आवर्तन मृगजळ

खडकवासला कालव्याचे आवर्तन मृगजळ

sakal_logo
By

सचिन लोंढे : सकाळ वृत्तसेवा
कळस, ता. १२ : इंदापूर तालुक्यातील अवर्षण प्रवण भागाला वरदान ठरलेल्या खडकवासला कालव्याचे आवर्तन शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे. हरितक्रांती घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या व शेतकऱ्यांसाठी हक्काचे पाणी असलेल्या कालव्याचे पाणी सध्या मिळण्याची शाश्वती राहिली नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. पाण्याअभावी हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच अडचणीत आले आहेत.

बेभरवशी झालेल्या पाण्यामुळे काही भांडवलदार शेतकऱ्यांनी शेती सिंचनासाठी वेगळा पर्याय निवडला आहे. मात्र सामान्य शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. दिवसेंदिवस तालुक्याला मिळणारे अपुरे पाणी, कालवा व वितरिकांची दुरवस्था यामुळे काही भागात शेतकऱ्यांनी वितरिका मोडीत काढल्या आहेत.

तालुक्यातील शेटफळगढे, पिंपळे, निरगुडे, पोंदेवाडी, अकोले, भादलवाडी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, डाळज, रुई, न्हावी, लोणी-देवकर, बळपूडी, कौठळी, बिजवडी, खामगळवाडी, पोंदवडी, तरंगवाडी, गोखळी, झगडेवाडी, वडापूरी, गलांडवाडी, बेडशिंगे आदी अवर्षण प्रवण भागातील सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित होते. मात्र तसे होताना दिसत नाही. कालवा व वितरिकांमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासूनचा साचलेला गाळ, वाढलेली झुडपे, ढासळलेल्या बाजू यामुळे कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या पिकापर्यंत पोचण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय कालव्याचे आवर्तन बेभरवशी झाले असून, येणारे पाणीही पुरेशा दाबाने येत नसल्याने शेतकऱ्यांना केवळ पाणी पहायला मिळत असल्याची वस्तूस्थिती आहे.

पुण्यातील धरणसाखळीतील खडकवासला धरणातील पाण्यावर इंदापूर तालुक्यातील शेती सिंचन अवलंबून आहे. कालवा व वितरिकांमुळे तालुक्यातील २१ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार होते. यानुसार तालुक्यात २६ वितरिका ४ शाखा व एका ठिकाणी थेट पाणी वितरणाची व्यवस्था केली आहे. यामध्ये वितरिका क्रमांक ३६ ते ६० ब अशा वितरिकांचा समावेश आहे तर लोणी, इंदापूर, वडापूरी व भाटनिमगाव अशा शाखा आहेत. (भाग १)

पुण्याच्या मागणीमुळे आवर्तन बेभरवश्याचे
वितरिका व शाखांतून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना वितरिकांतून पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. यामुळे प्रत्यक्ष लाभक्षेत्र व सिंचित होणाऱ्या क्षेत्रात कमालीची तफावत निर्माण झाली आहे. यातच आता पुण्याच्या पाण्याची मागणी वाढल्याने, कालव्याचे आवर्तन बेभरवश्याचे झाले आहे.

पाण्यासाठी संघर्ष पेटण्याची शक्यता
खडकवासला कालव्याच्या सिंचन आराखड्यातील एकूण लाभक्षेत्रापैकी प्रत्यक्षात सिंचित होत असलेले क्षेत्राचे प्रमाण कमालीचे घटले आहे. कालव्याच्या जीवावर २१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होणे अपेक्षित असताना सध्या केवळ २ हजार हेक्टर क्षेत्र कसेबसे भिजत आहे. एकूण लाभक्षेत्रापैकी सिंचित क्षेत्राचे हे प्रमाण ११ टक्क्यांवर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी आता कालव्याचे पाणी बिनभरवशी झाल्याने, भविष्यात कालव्याच्या पाण्यासाठी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

इंदापूर तालुक्यासाठी राखीव : ३.५ टीएमसी
कालव्याची वहनक्षमता : ८०० क्युसेक
सध्याचे आवर्तन : ४०० क्युसेक
सध्याचे सिंचन : २ हजार ३०० हेक्टर क्षेत्र


पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता गुणाले यांची प्रत्यक्ष भेट घेवून कालवा व वितरिकांच्या दुरवस्थेबाबत वस्तुस्थिती मांडली आहे. सध्या आवर्तन काळात पाणी मिळत नसल्याने, शेतकऱ्यांनी वितरिका मोडीत काढण्याचा सपाटा लावला आहे. विस्तार व सुधारणा अंतर्गत दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. याशिवाय लाकडी-निंबोडी योजनेतून पाणी उचलून ते खडकवासला कालव्यात सोडल्यास यातून सणसर कटव्दारे नीरा डावा कालव्यालगतच्याही शेतकऱ्यांना पाणी देणे शक्य होणार आहे.
- रमेश खारतोडे, जिल्हाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा
......................
01726