
काळेवाडीत सोलापूर महामार्गावर अपघाताचा धोका
पळसदेव, ता. २५ : काळेवाडी (ता. इंदापूर) येथील पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील खड्डा बुजविण्यासाठी टोल कंपनीच्या देखभाल दुरुस्ती विभागाला मुहूर्त मिळत नाही. यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे स्थानिक तसेच वानचालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
रात्रीच्यावेळी खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. खड्डा बुजविण्याचे काम गेल्या आठ दिवसांपासून अर्धवट अवस्थेत असून, यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे. भिगवण ते लोणी-देवकर या टप्प्यातील डाळज क्र.१,२,३, काळेवाडी क्र. १,२, पळसदेव गावांतील नागरिकांसाठी हा दररोजच्या वापरातील सेवा रस्त्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. शालेय विद्यार्थी, स्थानिक शेतकरी यांबरोबर दूध, ऊस वाहतुकीची वाहने या सेवा रस्त्याचा वापर करतात. काळेवाडीजवळील ओढ्यालगतच्या पुलाजवळ सेवा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे येथे अनेक किरकोळ अपघात झाले आहेत. यामुळे टोल कंपनीच्या देखभाल दुरुस्ती विभागाने येथील खड्डा उखडून आणखी मोठा केला आहे. खड्डा उखडल्यानंतर त्यावर डांबर-खडीचे मिश्रण टाकून दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र कामातील दिरंगाई स्थानिकांच्या गैरसोयीचे कारण बनले आहे.
डांबर मिळत नसल्याने खड्डे बुजविण्याचे काम रखडले आहे. दुरुस्तीचे काम मजबूत व्हावे यासाठी खड्डा वाढवून तो मिश्रणाने भरला जाणार आहे. यामुळे दोन दिवसांत काम पूर्ण केले जाईल.
- सुरजित सिंग, टोल कंपनीचे अधिकारी, देखभाल दुरुस्ती
01766