महिला दिनाला गृहप्रवेशाचे नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दिनाला गृहप्रवेशाचे नियोजन
महिला दिनाला गृहप्रवेशाचे नियोजन

महिला दिनाला गृहप्रवेशाचे नियोजन

sakal_logo
By

पळसदेव, ता. १ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इंदापूर तालुक्यातील घरकुलधारकांचा गृहप्रवेश व्हावा, या दृष्टिकोनातून पंचायत समितीपासून ग्रामपंचायतीपर्यंत सर्व अधिकारी व पदाधिकारी कामाला लागले आहेत. तालुक्यातील विविध टप्प्यात अर्धवट अवस्थेत असलेल्या व रखडलेल्या सुमारे एक हजाराहून अधिक घरकुलांची कामे पूर्ण करून महिलादिन त्यांचा गृहप्रवेश व्हावा, यासाठी कामे वेगाने करण्यात येणार आहेत.
इंदापूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलाचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची घरकुलाची कामे अपूर्णावस्थेत आहेत. अनेकांनी घरकुलाचा पहिला हप्ता घेऊनही प्रत्यक्ष कामाला सुरवात केली नाही. तर, काही लाभार्थ्यांच्या वैयक्तीक व गावपातळीवर अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या या समस्या सोडविण्यासाठी गावपातळीवर बैठक घेऊन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी तोडगा काढण्याचे प्रयत्न करावेत. ज्यांनी पहिला हप्ता घेतला आहे, त्यांना बांधकाम ठेकेदाराच्या माध्यमातून जेसीबीच्या साह्याने लगेच पाया खोदून काम सुरु करण्यात यावे, बांधकामासाठी लागणारे सिमेंट, वाळू, वीट आदी साहित्य पुरविण्याचे नियोजन करावे, अशा सूचना थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.
याबाबत माहिती देताना गटविकास अधिकारी विजयकुमार परीट म्हणाले, ‘‘आम्ही गेल्या काही दिवसांपासून ‘एक दिवस घरकुलांसाठी’ हा उपक्रम राबवीत तालुक्यातील घरकुलांच्या रखडलेल्या कामाचा आढावा घेतला आहे. याशिवाय त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. घरकुल लाभार्थ्यांसाठी एक दिवस देत त्यांच्या समस्या जाणून घेत काम सुरु करण्यास प्रोत्साहित केले आहे. याचा फायदा रखडलेली कामे सुरु होण्यास झाला आहे. याशिवाय अद्यापही एक हजारांहून अधिक घरकुलांची कामे विविध टप्प्यांमध्ये रखडलेली आहेत. नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांची बैठक झाली. यामध्ये गावपातळीवर पुढाकार घेऊन कामे सुरु करण्याची कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी दिली आहे. ८ मार्चला महिला दिनाचे औचित्य साधून या घरकुलधारकांचा गृहप्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. याअनुषंगाने सध्या कार्यवाही करण्यात येत आहे.’’