शेतीवरील व्यावसायिकांचे अर्थकारण थंडावले

शेतीवरील व्यावसायिकांचे अर्थकारण थंडावले

Published on

कळस, ता. १८ : जून महिन्याचा पंधरवडा उलटला तरी अद्याप पावसाने हजेरी लावली नाही. यामुळे शेतीशी संबंधित व्यवसायिकांचे अर्थकारण थंडावले आहे. खते- औषधे विक्रते, रोप विक्रेते, मशागतीची कामे करणारे ट्रॅक्टर चालक, याबरोबर इंदापूरसह जिल्ह्यात सर्वत्र व्यावसायिकांच्या व्यवसायावर थेट परिणाम होऊ लागला आहे. तालुक्यातील कृषी सेवा केंद्रचालकांनी खते, औषधे व बियाण्यांनी आपली दुकाने भरली आहेत. मात्र, पावसाअभावी ग्राहक नसल्याने दुकानदारांना पोत्यांची थप्पीकडे बघत बसण्याची वेळ आली आहे.
इंदापूर तालुक्याची रब्बीचा तालुका म्हणून ओळख आहे. मात्र, खरिपातील बेभरवशी पावसाच्या जिवावर सुमारे १६ हजार पाचशे हेक्टरवर खरिपातील बाजरी, मका यांसारख्या तृणधान्यांच्या पेरणीबरोबर तूर, मूग, उडीद यांसारख्या कडधान्यांची पेरणी करण्यास शेतकरी प्राधान्य देतात. भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस व उसाच्या लागवडीस शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जाते. मे महिन्याच्या अखेरीस तालुक्यात वळवाचे हमखास पाऊस होत असतो. शिवाय जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे हजेरी असते असा अनुभव येथील शेतकऱ्यांना आहे. वास्तविक वळवाच्या दमदार पावसानंतर वापश्यावर आलेल्या जमिनीवर खरिपाची पिके पेरणीस शेतकरी प्राधान्य देतात. यंदा मात्र अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, एकीकडे पावसाने ओढ दिलेली असताना, दुसरीकडे विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे शेतातील ऊस, फळबाग व जनावरांच्या चारा पिकांची गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. शेतात, विहिरींमध्ये बोरवेल खोदण्याची चढाओढ सुरू झाली असून, बोरवेल खोदून देणाऱ्या यंत्रमालकांची मात्र चलती आहे.


गुलाब रोपवाटीकाधारकांचे पावसाकडे डोळे
कळस परिसरात गुलाबाच्या रोपनिर्मितीचा मोठा व्यवसाय सुरू आहे. येथील तरुणांनी रोपनिर्मितीच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची निर्मिती केली आहे. दरवर्षी या परिसरात पन्नास लाखांहून अधिक रोपांची निर्मिती व विक्री केली जाते. जूनच्या सुरवातीलाच शेतकरी, व्यावसायिकांकडून येथील रोपांची खरेदी केली जाते. यंदा, मात्र पावसाने ओढ दिल्याने परिस्थिती बदलली आहे. रोप विक्रीसाठी तयार झालेले असताना, पाऊस नसल्याने रोपांची मागणी रोडावली आहे. एकीकडे रोप निर्मितीसाठी लाखोंचा खर्च करुनही त्याला ग्राहक नसल्याने पाणी घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ढगाळ वातावरणाने विहिरींनी तळ गाठला असताना, रोपांना पाणी द्यावे लागत असल्याची परिस्थिती म्हणजे दुष्काळात तेराव्या महिन्यासारखी झाली आहे.

01923, 01922

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.