उजनीत बुडालेला दुर्मिळ ठेवा पाण्याबाहेर

उजनीत बुडालेला दुर्मिळ ठेवा पाण्याबाहेर

सचिन लोंढे : सकाळ वृत्तसेवा
पळसदेव, ता. ४ : उजनी धरणात बुडालेले पळसदेव (ता. इंदापूर) येथील पळसनाथ व काशी विश्वनाथ या ग्रामदैवतांची मंदिरे सध्या धरणाच्या पाण्याबाहेर आली आहेत. त्यामुळे ती पाहण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळापासून पाण्यात राहूनही मंदिर अद्यापही सुस्थितीत असल्याचे दिसून येते.
पुणे- सोलापूर महामार्गापासून जवळच्या अंतरावर असलेल्या या मंदिरांना पाहण्यासाठी आवर्जून वाट वाकडी करून गेल्यास पर्यटकांना प्राचीन स्थापत्य कलेच्या अचाट सामर्थ्याचे दर्शन घडते. उजनी धरणातील पाणीसाठा उणे ३७ टक्क्यांवर पोचला आहे. त्यामळे पाणलोटक्षेत्रालगत असलेल्या, परंतु सध्या पाण्याबाहेर आलेली पळसदेव गावातील ही मंदिरे पर्यटकांना खुणावत आहेत.
पाण्यात बुडालेल्या जुन्या गावाच्या गावखुणा मोकळ्या झाल्याने अनेकांच्या डोळ्यासमोर समृद्ध पळसदेव गाव तरळत आहे. पाण्याबाहेर आलेल्या या गावाच्या गावखुणांवर नजर टाकल्यास एकेकाळी तालेवार असलेल्या या पळसदेवचे वैभव आजही दिसून येते. गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर ग्रामस्थांनी पळसनाथाचे पुनर्वसित गावात नव्याने मंदिर बांधले आहे. प्राचीन मंदिरातील शिवलिंग मंदिर पाण्यात जाण्यापूर्वीच ग्रामस्थांनी हलवून नवीन मंदिरात स्थापना केली. शिवाय काही प्राचीन मूर्ती नवीन गावात आणल्या. जुन्या मंदिराला मात्र ग्रामस्थांनी श्रद्धेपोटी आहे त्या स्थितीत सोडून दिले. हे मंदिर आजही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे.
प्राचीन गावाची माहिती देताना ग्रामस्थ सांगतात की, भीमा नदीच्या तीरावर वसलेले पळसदेव गाव त्याकाळी बाजारपेठेमुळे समृद्धीने फुललेले गाव होते. गावाभोवती तट व तटाला भट, नाथ, चांभार आणि मुख्य चार वेशी होत्या. गावाच्या पश्चिमेला ग्रामदैवत पळसनाथाचे सप्तभूमीज (शिखरावर सात मजले) मंदिर आहे. अशा पद्धतीचे मंदिर हे राज्यात दुर्मिळ समजले जाते.

पाचव्यांदा पूर्णपणे पाण्याबाहेर
यंदा कमी पाऊस झाल्याने काशी विश्वनाथाचे मंदिर पाण्यात बुडाले नव्हते. तर, कायम पाण्यामध्ये असलेले पळसनाथाचे मंदिर काही दिवसांपूर्वीच पूर्णपणे उघडे पडले आहे. उजनी धरणाच्या बांधणीनंतर सन १९७५ मध्ये जुन्या पळसदेव गावाला जलसमाधी मिळाली. त्यानंतर २४ वर्षांनंतर सन २००२ मध्ये मंदिर प्रथमच पूर्णपणे उघडे पडले होते. त्यानंतर सन २०१३, सन २०१७, सन २०२३ मध्ये मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते. धरणनिर्मितीपासून आतापर्यंतच्या काळात यंदा पाचव्यांदा मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आले. ज्या वर्षी दुष्काळ पडला त्या वेळी बुडालेले पळसदेव गाव व गावाच्या गावखुणा पाण्याबाहेर आल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

प्राचीन स्थापत्य कलेचे दर्शन
पळसनाथाचे मंदिर कलेच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, प्राचीन स्थापत्य कलेच्या अचाट सामर्थ्याचे दर्शन घडविते. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, तीन बाजूस कक्षासन, कोरीव स्तंभ, गर्भगृहाचे प्रवेशद्वार, त्यावरील पुष्प, नर, स्तंभ, लता व व्याल अशा पंचशाखा अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण हे मंदिर पर्यटकांना मोहात पाडून कित्येक वेळ जागेवर खिळवून ठेवते. या मंदिराशेजारीच बलीचे मंदिर आहे. या मंदिरातातील शिलेवर ‘शके १०१९’ असा उल्लेख आढळला आहे. त्यामुळे मंदिराची निर्मिती हजार वर्षांपूर्वीची असल्याच्या दाव्यास पुष्टी मिळते.

जतन होणे गरजेचे
मंदिर पाण्याबाहेर आल्यानंतर या प्राचीन वास्तूचे जतन होण्याची गरज असल्याच्या गोष्टीची नुसती चर्चा होताना दिसते. प्रत्यक्षात मात्र यासाठी कोणीच पुढे येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुक्यातील दानशूर व ग्रामस्थ, पुरातत्त्व विभाग, इतिहास संशोधकांनी एकमेकांची सांगड घालून पळसनाथ व काशी विश्वनाथ या दोन्ही मंदिरांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.

मंदिर पाहण्यासाठी कसे जाणार?
पुणे- सोलापूर महामार्गावर पळसदेव गाव आहे. गावाच्या मुख्य प्रवेशद्वारातून जाणाऱ्या रस्त्याने सुमारे तीन किलोमीटर अंतर पार केल्यानंतर नदी किनारी पोचता येते. दुचाकी, चारचाकी वाहने थेट
नदीपात्रात जातील, असा रस्ता आहे. तेथून पुढे होडीच्या साह्याने पाण्याचे काही अंतर पार केल्यानंतर मंदिराजवळ पोचता येते. होडीची सोय पुरविण्यासाठी काही स्थानिक मच्छिमारांकरवी अल्प दरात सेवा पुरविली जात आहे. त्यानंतर मंदिराच्या तटातून आत गेल्यानंतर मंदिर पाहता येते.

काय पाहता येईल
- ग्रामदैवत पळसनाथाचे प्राचीन मंदिर
- बलीचे मंदिर
- काशी विश्वनाथाचे मंदिर
- मंदिरावरील शिलालेख
- सप्तभुमिज शिखर
- मंदिर गाभाऱ्यातील कोरीव शिला
- उन्हाच्या चटक्यातही अल्हाददायक गारवा देणाऱ्या मंदिर परिसरातील ओवऱ्या
- सप्तसुरांची निर्मिती होणाऱ्या शिला
- काशी विश्वनाथ मंदिरावरील रामायणाचा दाखला देणारी शिला शिल्पे
- सतीची शिल्पे, वीरगळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com