पाण्याच्या नियोजनाअभावी शेतीचे अर्थकारण ठप्प

पाण्याच्या नियोजनाअभावी शेतीचे अर्थकारण ठप्प

पळसदेव, ता. १४ : पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडल्या पाण्यामुळे धरणग्रस्तांचे प्रपंच संपुष्टात आले असल्याची प्रतिक्रिया पुनर्वसित गावांतील शेतकरी व्यक्त करत आहेत. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या इंदापूर, दौंड, करमाळा, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यातील शेतकऱ्यांचे पाण्याच्या नियोजनाअभावी शेतीचे अर्थकारण पूर्णपणे ठप्प झाले आहे.

यंदा धरणातील पाण्याच्या भरवशावर पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. धरणात हक्काचे पाणीच राहिले नसल्याने, आता निसर्गाची कृपादृष्टी व्हावी यासाठी साकडे घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे वळवाच्या पावसाकडे डोळे लागले आहेत. तर दुसरीकडे धरणातील गाळयुक्त पाणी फुटव्हाॅलपर्यंत पोचविण्यासाठीची धडपडही सुरु आहे. एवढ्यातूनही आमचे हक्काचं पाणी गेलं कुठे0 असा सवाल शेतकरी करत आहेत.
उजनी धरणाच्या बांधणीनंतर धरणग्रस्तांसाठी धरणातील बारमाही पाण्याची सोय करण्यात आली होती. परंतु सन १९८४ नंतर शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी आठमाही परवानगी देण्यात आली आहे. यातून उरलेले पाणी मराठवाड्यातील सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले. नाममात्र मोबदल्यावर शेतीसह घरादाराचा त्याग केलेल्या शेतकऱ्यांना नव्याने बस्तान बसविणे आव्हानात्मक होते. मात्र उजनीच्या पाण्याच्या आधारावर सुरवातीची काही वर्षे शेतकऱ्यांसाठी चांगली ठरली. परंतु शेतीसिंचनासाठी आठमाही पाणी परवानगीचा निर्णय झाल्यानंतर शेतकऱ्यांचे पिकांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.

गेल्या काही वर्षांपासून धरणग्रस्तांच्या समस्यांत आणखी वाढ झाली आहे. एकीकडे पिकांची लागवड करायची व दुसरीकडे प्रशासनाने धरण रिकामं करायचं. यात शेतकऱ्यांची अवस्था अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीसारखी होत आहे. धरणातील १२३ टीएमसी पाण्यापैकी उपयुक्त साठ्यातील ९.६० टीएमसी पाणी धरणग्रस्तांसाठी राखीव आहे. मात्र धरणग्रस्तांचे हेच राखीव पाणी अलीकडच्या काळात चोरी होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.


पावसाळ्यानंतर धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्याची तरतूद नसतानाही पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली नदीत पाणी सोडले जाते. वास्तविक पिण्याच्या पाण्याची गरज व सोडण्यात येणारे पाणी यात मोठी तफावत आहे. अर्धा टीएमसी पाण्याची गरज भागविण्यासाठी सहा टीएमसी पाणी सोडले जाते, यात नेमका कोणाचा स्वार्थ आहे हा संशोधनाचा विषय आहे. मात्र पाणी वितरणातील गौडबंगाल धरणग्रस्तांना कंगाल करणारे ठरले आहे.
- अरविंद जगताप, अध्यक्ष, उजनी धरणग्रस्त बचाव कृती समिती


भीमा नदीतून पाणी सोडण्याचा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्यासारखा आहे. लाखोंचा खर्च करून नदीलगतच्या पट्ट्यात चारा, फळबाग व उसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, पावसाळा संपल्यापासून आतापर्यंत तरतूद नसतानाही चार वेळा नदीतून पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी यंदाचा साखर हंगाम कारखानदारांसाठी कडू ठरण्याची चिन्हे आहेत. तर शेतकऱ्यांचे प्रपंच अडचणीत आले आहेत.
- भूषण काळे, संचालक, कर्मयोगी साखर कारखाना


राजकीय स्वार्थापोटी उजनीचे पाणी पळविण्याचा प्रयत्न होतो. मात्र यामध्ये धरणग्रस्तांचे प्रपंच अडचणीत येत आहेत. कर्नाटकातील निवडणुकांमध्ये राजकीय पोळी भाजण्यासाठी उजनीच्या पाण्याचा वापर झाल्याचेही समोर आले आहे. यामुळे स्थानिक धरणग्रस्तांवर पाणी संकट निर्माण झाले आहे.
- हनुमंत मोरे, प्रगतशील शेतकरी


02437

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com