इंदापूरला मिळणार अर्धा टीएमसी पाणी

इंदापूरला मिळणार अर्धा टीएमसी पाणी

कळस/शेटफळगढे, ता. १ : इंदापूर तालुक्याला पिण्यासाठी खडकवासला कालव्याचे पाणी मिळावे, या मागणीसाठी खडकवासला कालवा संघर्ष कृती समितीने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. कालव्यातून सुमारे अर्धा टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला पिण्यासाठी देण्याची सूचना पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटबंधारे विभागाला दिली असून, येत्या चार-पाच दिवसांत तालुक्यात पाणी येईल असे कालवा संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

खडकवासला कालव्याच्या पट्ट्यातील टंचाईची परिस्थिती विचारात घेऊन आमदार दत्तात्रेय भरणे यांनीही पालकमंत्र्यांकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती तर संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून शुक्रवारी (ता. ३१) शेकडो शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन करुन टंचाईची दाहकता शासन दरबारी पोचविली होती. परिणामी तालुक्याला सुमारे अर्धा टीएमसी पाणी दिले जाणार आहे.
इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या पट्ट्यात टंचाईची भीषणता सर्वाधिक आहे. शेजारच्या दौंड तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी कालव्याचे आवर्तन देण्यात आले. मात्र इंदापूरकरांना पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले. यामुळे तालुक्यातील जनतेमधून रोष व्यक्त केला जात होता. आमच्या हक्काच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवले जात असल्याची येथील नागरिकांची भावना झाली. सिंचनासाठी नाही तर पिण्यासाठी पाणी द्यावे या मागणीसाठी खडकवासला कालवा संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून एल्गार करण्यात आला. गावांगावातील लोकांनी या आंदोलनात सहभागी होऊन, उन्हाचे चटके सोसत महामार्गावर ठिय्या मांडला होता.


पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी देण्याची मागणी करण्यात आली. यानंतर आज सकाळी कृती समितीच्या सदस्यांनी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेऊन पाणी देण्याची मागणी केली. यावर पालकमंत्र्यांनी अर्धा टीएमसी पाणी देण्याची सूचना दिल्याचे संघर्ष समितीचे विजय गावडे, रमेश खारतोडे यांनी सांगितले.

खडकवासला कालवा संघर्ष कृती समितीच्या मागणीनुसार इंदापूर तालुक्याला अर्धा टीएमसी पाणी देण्याबाबतचा निर्णय झाला आहे. पुढील चार-पाच दिवसांत तालुक्यात पाणी येईल.
- श्‍यामराव भोसले, प्रभारी उपविभागीय अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com