इंदापूर तालुक्यात चिंकारा असुरक्षित

इंदापूर तालुक्यात चिंकारा असुरक्षित

Published on

कळस, ता. ५ : इंदापूर तालुक्यातील वन क्षेत्राच्या वैभवात भर घालणाऱ्या चिंकारा सध्या असुरक्षिततेच्या गडद छायेत आहेत. वन क्षेत्रालगत वाढणारे औद्योगीकरण, माळरानात फोफावलेला खडी क्रशर व्यवसाय व परिणामी होणारी अवजड वाहतूक, पोल्ट्री व्यावसायिकांकडून मृत कोंबड्या व चिकन व्यावसायिकांकडून वनात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वाढलेला वावर या आणि अशाच काही कारणांमुळे दिवसेंदिवस वनातील चिंकारांच्या सुरक्षिततेवर गदा येत असल्याचा आरोप वन्यप्रेमींकडून होत आहे. गेल्या काही वर्षांपासून या समस्यांमध्ये वाढ होत असून वन विभागाकडून या गोष्टींना आळा घालण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.
इंदापूर तालुक्यात सुमारे ६ हजार १३६ हेक्टर वनक्षेत्र आहे. यामध्ये प्रामुख्याने चिंकारा, लांडगे, तरस, ससे, घोरपड, साप, खोडक, कोल्हे, सायाळ, मोर, बगळे, टिटवी, चिमणी यांसारखे शेकडो प्रजातीचे प्राणी व पक्षी वास्तव्यास आहेत. येथील चिंकारा हरणांमुळे वन क्षेत्राच्या वैभवात भर पडली आहे. कळस गावचे ग्रामदैवत हरणेश्वर असल्याने या परिसरात चिंकारा हरणांना अभय आहे. चिंकारांकडून होणारे नुकसान निमूटपणे सहन करत शेतकरी त्यांच्या पाण्याची सोय करताना दिसतात; परंतु सध्या वनाचे माळ भकास होवू लागल्याचे दिसत आहे. कळपाने फिरणारे चिंकारा दुर्मिळ होत चालले आहेत.
एकीकडे तालुक्याची विकास एक्स्प्रेस सुसाट सुरू आहे. तर दुसरीकडे विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या गौण खनिज पुरवठ्यासाठी सुरू असलेल्या धडपडीत वन क्षेत्र भकास होवू लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून खडीक्रशरची संख्या वाढली आहे. परिणामी क्रशर माफियांची वन जमिनीतील गौण खनिजाचा उपसा करण्यापर्यंत मजल गेल्याची काही उदाहरणे आहेत. यामुळे तेथेही वन क्षेत्राला व परिणामी वन्यजीवांना नुकसान पोचले.

वनविभागाच्या माध्यमातून काही ठोस उपाययोजनांची नितांत गरज आहे. वनात चराऊ कुरणांची निर्मिती, सोलर पंपाच्या माध्यमातून पाणी व्यवस्था, सोलर कॅमेऱ्यांची व्यवस्था, गस्त वाढविणे, अतिक्रमण रोखणे यांसारखी काही कामे तत्काळ करावीत.
- अॅड. श्रीकांत करे, वन्यजीव प्रेमी

सध्या चिंकारांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही; परंतु जानेवारीमध्ये गणना केली जाणार आहे. यानंतर निश्‍चित आकडेवारी समोर येईल.
- भाग्यश्री ठाकूर, वन परिक्षेत्र अधिकारी, बारामती तालुका


3167

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com