इंदापूर शिक्षण विभागाला रिक्त पदांचे ग्रहण
पळसदेव, ता. २७ ः इंदापूर तालुक्यातील शिक्षण विभागाला सध्या रिक्त पदांच्या गंभीर समस्येने ग्रासले आहे. तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा कणा समजल्या जाणाऱ्या उपशिक्षकांपासून ते थेट धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या गटशिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत शेकडो पदे रिक्त आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कार्यरत शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने तालुक्याचा शैक्षणिक आलेख घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तालुक्याच्या शिक्षण विभागाचे नेतृत्व करण्यासाठी मंजूर असलेले गटशिक्षण अधिकारी हे पद गेल्या ७ महिन्यांपासून रिक्त आहे. येथील गटशिक्षण अधिकाऱ्यांचा प्रभारी पदभार बारामतीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. याशिवाय विस्तार अधिकाऱ्यांचीही ५० टक्के पदे (६ पैकी ३) रिक्त असल्याने शाळांच्या तपासणीवर आणि मार्गदर्शनावर मर्यादा आल्या आहेत.
पर्यवेक्षकीय यंत्रणा व्हेंटिलेटरवर
शाळा आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे केंद्रप्रमुख होय. मात्र तालुक्यात केंद्रप्रमुखांच्या २६ मंजूर पदांपैकी तब्बल १९ पदे रिक्त आहेत. केवळ ७ केंद्रप्रमुख संपूर्ण तालुक्याचा भार सांभाळत आहेत. एका केंद्रप्रमुखाकडे तीन ते चार केंद्रांचा अतिरिक्त पदभार असल्याने शाळांच्या भेटी, पोषण आहार तपासणी आणि शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.
पालकांत संतापाची लाट
तालुक्यात उपशिक्षकांची ७५ पदे रिक्त आहेत, तर पदवीधर शिक्षकांची स्थिती अधिक गंभीर आहे. ५० मंजूर पदांपैकी केवळ ३१ पदे भरलेली असून ३४ पदे रिक्त आहेत. मुख्याध्यापकांची २ पदेही रिक्त आहेत. यामुळे अनेक शाळांमध्ये एकाच शिक्षकाला अनेक वर्ग सांभाळावे लागत असल्याचे चित्र आहे. शिक्षणाचा श्रीगणेशा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी मंजूर पदांची भरती करण्याची गरज असल्याचे मत पालक व्यक्त करत आहेत. खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी शिक्षक प्रयत्न करत असताना, शासनाकडून पदे भरली जात नसल्याने पालकांमध्ये संतापाची लाट आहे.
तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या
जिल्हा परिषद शाळांची संख्या - ३७७, विद्यार्थी संख्या - १६८६३
अनुदानित माध्यमिक विद्यालय संख्या - ९८, विद्यार्थी संख्या- ४०४३०
स्वयंअर्थसहाय्यित शाळांची संख्या - ४४, विद्यार्थी संख्या- १८४३१
मंजूर व रिक्त पदांची आकडेवारी
उपशिक्षक - मंजूर पदे - ९२४, कार्यरत - ८६०, रिक्त - ७५
पदवीधर शिक्षक - मंजूर पदे - ५०, कार्यरत - ३१, रिक्त ३४
मुख्याध्यापक - मंजूर पदे - २४, कार्यरत - २२, रिक्त २
केंद्रप्रमुख - मंजूर पदे - २६, कार्यरत - ७, रिक्त - १९
विस्तार अधिकारी - मंजूर पदे - ६, कार्यरत - ३, रिक्त - ३
गटशिक्षण अधिकारी - मंजूर पदे - १, रिक्त - १
जून महिन्यापासून इंदापूर तालुक्यातील गट शिक्षण अधिकाऱ्यांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. इंदापूर व बारामती दोन्ही तालुके मोठे आहेत. शिवाय येथील शाळांची संख्याही मोठी आहे. यामुळे दोन्ही तालुक्याची जबाबदारी सांभाळताना ओढाताण होत आहे. परंतु उपलब्ध कर्मचारी वर्गाच्या माध्यमातून नियोजन करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घेत आहे.
-नीलेश गवळी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी

