उजनीचा ‘पाहुणचार’ नकोसा झाला
पळसदेव, ता. ४ : दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागताच उजनीच्या विस्तीर्ण जलाशयावर गुलाबी रंगाची उधळण करणारे ‘अग्निपंख’ म्हणजेच फ्लेमिंगो पक्षी यंदा मात्र गायब झाले आहेत. गेल्या काही महिन्यांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही शेकडो प्रजातीच्या पक्षांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली आहे. मात्र उजनीच्या पाणलोट क्षेत्राला गुलाबी किनार निर्माण करणारे फ्लेमिंगो मात्र अद्यापही येथे दाखल झाले नाहीत. या ‘गुलाबी पाहुण्यां’विना उजनीचा काठ यंदा सुना-सुना वाटत असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.
गेल्या काही वर्षांत उजनी धरणातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. औद्योगिक क्षेत्रातून थेट भीमा नदीत सोडण्यात येणारे रसायनमिश्रित सांडपाणी, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतून येणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी, यामुळे धरणातील पाण्याचा दर्जा खालावला आहे. या प्रदूषित पाण्यामुळे अन्नसाखळी धोक्यात आली आहे. कच्छच्या रणांतून येथे दाखल होणारे फ्लेमिंगो पक्षी प्रामुख्याने ज्या शेवाळ आणि कीटकांवर जगतात, त्यांच्या वाढीवर प्रदूषणाचा विपरीत परिणाम झाला आहे. याशिवाय बहुतांश ठिकाणी पाण्यातील रसायनांमुळे दुर्गंधी पसरली असून, हे वातावरण या संवेदनशील पक्षांसाठी असुरक्षित ठरत आहे. या दूषित पाण्यामुळे पक्षांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसून, त्यांना आरोग्याचा धोका असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
‘‘फ्लेमिंगो पाहण्यासाठी उजनीच्या पाणलोटक्षेत्रात दरवर्षी पर्यटक व छायाचित्रकार गर्दी करत असतात. यंदा मात्र पक्षांनी हजेरी न लावल्याने स्थानिक नौकाविहार व हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे,’’ असे क्रांती फ्लेमिंगो पॉइंटचे दत्ता नगरे यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘उजनीतील प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्यक्ष कृती शून्य असल्याची माहिती समोर येत आहे. जर हीच परिस्थिती राहिली, तर भविष्यात उजनीचे नाव जागतिक पक्षी नकाशावरून पुसले जाण्याची भीती आहे. फ्लेमिंगो हे पर्यावरणाचे दूत आहेत. त्यांनी पाठ फिरविणे ही निसर्गाकडून मिळालेली धोक्याची घंटा आहे. वेळीच प्रदूषण रोखले नाही तर आपण हे वैभव कायमचे गमावू.’’
दरम्यान धरणातील वाढते प्रदूषण व सध्याचा मुबलक पाणीसाठा या कारणाने फ्लेमिंगोने पाठ फिरविली असण्याची शक्यता आहे. मात्र या पक्षांनी पाणलोट क्षेत्राकडे पाठ फिरविणे म्हणजे भविष्यातील धोक्याची घंटा असल्याचे मत बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या (बीएनएचएस) शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
ठळक मुद्दे
१) दरवर्षी जानेवारीच्या सुरवातीला ग्रेटर फ्लेमिंगो (रोहित) उजनीच्या पाणलोटक्षेत्रात दाखल होतात.
२) उजनीत येणाऱ्या फ्लेमिंगोंची संख्या तीन ते पाच हजारांच्या आसपास असते.
३) दलदलयुक्त पाणथळ जागेवरील शेवाळ, जलकिटक हे भक्ष यांना मुबलक मिळते.
४) प्रदूषणामुळे नैसर्गिक शेवाळ निर्मितीवर गंभीर परिणाम.
५) उजनी धरणात सध्या ९५ टक्के पाणी साठा. परिणामी दलदलीची ठिकाणं अद्यापही तयार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

