माळावर फुलविले जैवविविधतेच्या संवर्धनातून नंदनवन
पळसदेव, ता. १० : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील कुसळे उगविणाऱ्या माळावर रामकृष्ण येकाळे या अवलियाने जैवविविधतेच्या संवर्धनातून नंदनवन फुलविले आहे. स्वमालकीच्या पाच एकर क्षेत्रात विविध प्रकारची जंगली देशी झाडे, औषधी वनस्पती, फळझाडे व फुलझाडांची लागवड करून जैवविविधतेतील अन्नसाखळीला चालना दिली आहे. या माळरानावर ६०० हून अधिक जाती-उपजातीच्या फळे-फुलांच्या रोपांची लागवड केली आहे.
या नंदनवानात ३८ प्रकारचे पक्षी व काही स्थानिक प्राण्यांचा अधिवास आढळून येत आहे. त्यांच्या निवाऱ्याची व खाद्यान्नाची नैसर्गिकरित्या सोय झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर उपशिक्षक असलेल्या येकाळे यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. त्यांनी शेतजमिनीतून नगदी पिके घेण्याला फाटा दिला आहे. जे निसर्गाचे देणे आहे, ते निसर्गातील घटकांसाठी उपयोगात यावे ही निःस्वार्थी भावना ठेवून त्यांनी दगड-गोटे असलेल्या माळरानाचा कल्पकतेने वापर करून माळावर मळा फुलविला आहे.
येकाळे यांनी फुलविलेले नंदनवन पाहण्यासाठी व माहिती घेण्यासाठी देशभरातून अनेक वनस्पती अभ्यासक, शेतकरी, वैद्यकीय विद्यार्थी येथे हजेरी लावत आहेत. सेंद्रिय शेतीला चालना देणारे सुभाष पाळेकर यांनीही १९ राज्यातील शेतकऱ्यांसोबत येथे भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान, आम्ही ही सेवा विनामूल्य पुरवत आहोत. याशिवाय येथे शुद्ध हवा, पक्ष्यांचा किलबिलाटामुळे मन प्रसन्न होते, असे रामकृष्ण येकाळे यांनी सांगितले.
रामकृष्ण येकाळे म्हणतात..
- कमी होणारी देशी वृक्षांची संख्या, आयुर्वेदिक वनस्पतींचा तुटवडा लक्षात घेऊन माळरानाचा विकास करण्याचे नियोजन
- सह्याद्रीच्या पट्ट्यात मिळणारे दुर्मीळ बीज येथे उपलब्ध होणार
- बीज संकलनासाठी फिरणाऱ्यांसाठी नंदनवन पर्वणी.
- देशी झाडांच्या माध्यमातून पक्ष्यांचा निवारा व खाद्याची सोय होण्यास मोठी मदत
- वैद्यकीय व वनस्पती शास्त्रातील विद्यार्थ्यांना, वनस्पती अभ्यासकांना एकाच ठिकाणी विविध वनस्पतींची ओळख होणार
रामकृष्ण येकाळे यांनी स्वतःच्या शेतावर जंगलनिर्मिती करण्याचा केलेला धाडसी प्रयोग वाखाणण्याजोगा आहे. भांडवलदार शेतकऱ्यांनी अशा प्रकल्पाची उभारणी करणे काळाची गरज आहे. देशी वृक्ष, आयुर्वेदिक वनस्पती, विविध फळझाडे, फुलझाडे यामुळे येथे मधमाशीपासून ते प्राण्यापर्यंत सर्वांच्या अन्नाची सोय झाल्याने, येथे जैवविविधतेतील अन्नसाखळी भक्कम झाली आहे.
- दत्तात्रेय लांघी, पक्षी निरिक्षक
लागवड केलेली झाडे
फळझाडे : सफरचंद (३ प्रकार), आंबा (५२ प्रकार), फणस (५ प्रकार), चिकू (३ प्रकार), जांभूळ (९ प्रकार), पेरू (१२ प्रकार), नारळ (५ प्रकार), चिंच (४ प्रकार), अंजीर (२ प्रकार), काजू.
औषधी व वेलवर्गीय वनस्पती : हळदू, शतावरी, माकडशिंगोळी, गुंज, सोमवेल, हाडजोडी, गेळ फळ, अडूळसा, तुळस, हिरडा, बेहडा, दहीपळस, अंबाडा, माकडलिंबू, कोरपड, आवळा.
फुलझाडे : काटेसावर, पळस, सोनसावर, देवसावर, बूचपांगारा, ताम्हण, बहावा, प्राजक्त, बकूळ.
मसाला झाडे : ऑल स्पायसेस, ओवा, दालचिनी, वेलदोडा, तेजपत्ता, लवंग, मिरी.
सुगंधी वनस्पती : दवणा, रोझमेरी, सुगंधी निलगिरी, अजमेरी गुलाब.
जंगली देशी झाडे
चांदकुडा, काळाधूप, चेर, साजेरी, पिसा, फणसाडा, सेमलाकांचन, अंजन, उंडी, अजानवृक्ष, बोधीवृक्ष, गुळूम, रामधन चंपा, भोरसाल, डोमसाल, नरांबा, आंबेरी, पेटारी, फुडगूस, कामट्टी, फणशी, महाभूत्याकेस, कहांडळ, दक्षिणमोह, पांढरा धूप, तालबोटी, लक्ष्मीतरू, वड (५ प्रकार), खडकपायर, नाना, पिंपरद, नांदरुक, अर्जुन, वाळूंज, कदंब, कळंब, भूईउंबर, साग, बेलपाटा, गोविंदू.
३८ प्रकारच्या पक्ष्यांचे वास्तव्य
नंदनवनात येथे मोर, हळद्या, कोतवाल, रातवा, धाविक, खंड्या, बुलबुल, सूर्यपक्षी, चष्मेवाला, सूभग यांसारखे ३८ प्रकारचे पक्षी वास्तव्यास आहेत. याशिवाय १५ प्रकारची फुलपाखरे, कीटक यांची संख्या मोठी आहे. यामुळे येथे जैवविविधता तयार झाली आहे. याबरोबर चिंकारा, सायाळ, ससे, कोल्हा, खारुताई यांसारख्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. सरडे, शामिलेऑन सरडा, घोरपड, विंचू, गोम, सापसुरळी यांसारखे सरपडणारे प्राणी वास्तव्यास आहेत.
03364
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

