
शिक्रापूर, लोणीकंद येथून पीएमपीएमएलकडून मोफत सेवा
कोरेगाव भीमा, ता. १ : पेरणे (ता. हवेली) येथे अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्यांसाठी शासनाच्या वतीने नियोजन करून शिक्रापूर येथे १८० तर लोणीकंद येथून १८० अशा एकूण ३६० बसची मोफत सेवा पुरविण्यात आली. यासाठी दोन शिफ्टमध्ये सुमारे दीड हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनीही कोरेगाव ते शिक्रापूर मार्गावर बसप्रवास करून या सुविधेचा आढावा घेत बसमधील प्रवाशांशीही संवाद साधला.
दरम्यान, पुण्याहूनही पेरणे येथे जाण्यासाठीही आज ९० बसेस सोडण्यात आल्याचे पीएमपीएमएलचे व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी सांगितले. येथेही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरविण्यात आली. कोरेगाव भीमा येथे आलेल्या अनुयायांची वाहने शिक्रापूर व लोणीकंद येथील वाहनतळावरच थांबवून तेथून ३६० बसेसमधून त्यांना कोरेगाव भीमा - पेरणे या ठिकाणी विजयस्तंभ व वढू बुद्रुक येथे छत्रपती शंभू महाराज समाधी, गोविंद गोपाळ समाधी परिसरात अभिवादनासाठी ने-आण करण्यात येत होती. तसेच मानवंदना दिल्यानंतर देखील लगेचच सर्व बांधवांना पुन्हा पार्किंगजवळ आणून सोडले जात होते. दुपारनंतर गर्दी वाढल्याने बस व्यवस्थेवरही ताण आला. रात्री उशिरापर्यंत वाहतुकीसाठी बससेवेचे नियोजन करण्यात आले होते.