
‘देहू-तुळापूर रस्त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद’
केसनंद, ता. १३ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शक्तीस्थळे असलेल्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक व तुळापूर तसेच देहू-आळंदी ही तीर्थस्थळे जोडणाऱ्या देहू-आळंदी-मरकळ-तुळापूर रस्ता यासाठी सुमारे ५४. २२ कोटी रुपये खर्चाच्या कामाचा समावेश खास बाब म्हणून केंद्रीय मार्ग निधीमध्ये (CRF) प्राधान्याने करण्याबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून केलेल्या मागणीस केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण मार्ग असलेल्या व पुणे जिल्ह्याच्या खेड व हवेली तालुक्यातून जाणाऱ्या आळंदी-मरकळ- तुळापूर-फुलगाव-लोणीकंद-थेऊर-लोणी काळभोर-वडकी-उंड्री- कात्रज या राज्य मार्ग क्र.११६ या रस्त्याची सध्या दुरवस्था झालेली आहे. या मार्गावरुन मोठ्या संख्येने नागरिक देवदर्शनासाठीही येत असतात. तसेच मराठवाड्याहूनही मुंबईला मालवाहतुकीसाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. त्यामुळे वाहतुकीचा प्रमुख मार्ग असलेल्या या रस्त्याचे काम लवकरात लवकर हाती घेणे आवश्यक आहे. या रस्त्याचे किमी २१/४०० ते किमी ३८/८०० या कामाचे ५४.२२ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभाग, दक्षिण, पुणे यांच्याकडून सादर करण्यात आले आहे. त्यानुसार या कामाचा समावेश खास बाब म्हणून केंद्रीय मार्ग निधीमध्ये (CRF) प्राधान्याने समावेश करावा, अशी मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेली होती. त्यास गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने रस्त्याचा हा प्रश्न लवकर सुटण्यास मदत होणार असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.