मतदान केंद्र परिसरात मोबाईल, वाहनबंदीचा अतिरेक

मतदान केंद्र परिसरात मोबाईल, वाहनबंदीचा अतिरेक

कोरेगाव भीमा, ता. १३ : कोरेगाव भीमा येथे मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल व वाहन नेण्यास प्रशासनाने बंदी घातल्याने ज्येष्ठ मतदार, कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत ऐनवेळी माहिती मिळाल्याने तसेच वाहन पार्किंगही दूरवर असल्याने ज्येष्ठ मतदारांची गैरसोय झाली.

यापूर्वीच्या टप्प्यातील मतदानप्रक्रियेत मतदान केंद्रांमध्ये मतदान करतानाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने यावेळी आदर्श नियमावलीचे पालन व्हावे, यासाठी मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी घातली. ऐनवेळी घरच्यांशी संपर्क व्हावा, तसेच मतदान चिठ्ठी मोबाईलवर दाखवता यावी, यासाठी मोबाईलचा उपयोग होत होता. असे असताना केंद्र परिसरात मोबाईल तसेच वाहनही नेण्यास प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देताच बंदी घातल्याने गैरसोय झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

ऐनवेळी आणलेले मोबाईल मतदान केंद्र परिसराबाहेर ठेवण्याची सूचना पोलिसांकडून दिली जात असताना केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधाच नसल्याने सुरक्षितपणे मोबाईल ठेवायचे कुठे याचाही प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे पोलिस व मतदार यांच्यात शाब्दीक वादाचे प्रसंगही घडत होते. अखेर याबाबत पुढाकार घेत काही सुजाण स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी अनेकांना मोबाईल सांभाळण्यास मदत केली. ऐन उन्हात पायी चालत आलेले काही वृद्ध तसेच महिला मतदार नाराजी व्यक्त करत मतदान केंद्रावरून परत फिरत होते. याचा फटका बसून मतदानाची टक्केवारी घटण्याची भीतीही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

बंदोबस्ताच्या नावाखाली प्रशासनाने अतिरेक करत पूर्वकल्पना न देताच मोबाईल तसेच वाहनेही केंद्र परिसरात नेण्यास बंदी घातल्याने अनेक ज्येष्ठ मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. तर बंदोबस्तावरील पोलिस कर्नाटकातील असल्याने त्याच्याशी संवादही साधता येत नव्हता. याबाबत पोलिस तसेच प्रशासनाकडून कोणीही तक्रार ऐकून घेण्यास तयार नव्हते.
विवेक ढेरंगे, कोरेगाव भीमा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com