
वाफगावात आज रंगणार राज्याभिषेकदिन सोहळा
पुणे, ता. ५ : महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या राज्याभिषेकदिन सोहळ्याची वाफगाव (ता. खेड) येथे जय्यत तयारी झाली असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
महाराजा यशवंतराव होळकर यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर ६ जानेवारी १७९९ रोजी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता. वाफगावच्या किल्ल्यात त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे येथे राज्याभिषेकदिन सोहळा साजरा केला जातो. यानिमित्त किल्ल्याचा परिसर सडारांगोळीने सजवला आहे. किल्ल्याला तोरण बांधले आहेत. येथील ऐतिहासिक बारवेची स्वच्छता केली आहे. ध्वजाचे खांब सजविण्यात आले आहेत. सातारा येथील गजीनृत्य व सांगली येथील वालूग नृत्याची पथके वाफगाव येथे दाखल झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात व भंडारा उधळत शुक्रवारी (ता. ६) सकाळी कुलदेवतेची पालखी मिरवणूक काढण्यात येईल.
याबाबत भूषणसिंहराजे होळकर म्हणाले, ‘‘स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेण्यामध्ये होळकर घराण्याचे मोलाचे योगदान आहे. या होळकर राजघराण्याने उत्तर हिंदुस्तानमध्ये २२० वर्ष यशस्वीपणे राज्य केले. या पराक्रमी होळकर घराण्याचे वाफगाव हे मूळगाव. आपल्या मूळ गावाची आठवण व महाराष्ट्रातील होळकरांचे मुख्य लष्करी ठाणे म्हणून सुभेदार मल्हारराव होळकर यांनी वाफगावला भव्य भुईकोट किल्ला उभारला. होळकर राजघराण्यातील अनेकांचे वास्तव्य विविध कालखंडामध्ये या किल्ल्यामध्ये राहिले आहे.’’