
मोटारीच्या धडकेत दोघांचा मृत्यू
केडगाव, ता. ७ : खुटबाव (ता. दौंड) येथील साळोबा वस्ती परिसरात शुक्रवारी (ता. ६) रात्री झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. ज्ञानदेव गुलाब शेळके (वय ६४), ज्ञानदेव लाला खंकाळ (वय ४० दोघेही रा. साळोबा वस्ती, खुटबाव), अशी त्यांची नावे आहेत. याबाबत मोटार चालक आकाश अनिल जगताप (रा. यवत, ता. दौंड) यास पोलिसांनी अटक केली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्ञानदेव शेळके व ज्ञानदेव खंकाळ व खंकाळ यांची सून प्रियांका खंकाळ हे शुक्रवारी रात्री यवत-खुटबाव रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी साळोबा वस्ती परिसरात आकाश जगताप याच्या भरधाव मोटारीची (क्र. एमएच१२ यूयू २९९९) शेळके व खंकाळ यांना पाठीमागून जोराची धडक बसली. अपघातानंतर जगताप याने जखमींना मदत न करता तेथून पळ काढला. या अपघातात शेळके व खंकाळ यांना मोटारीने फरफटत नेले. दोघांच्याही डोक्याला, पोटाला, हातापायांना गंभीर जखमा झाल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातप्रसंगी प्रियांका खंकाळ यांनी मोटारीचा क्रमांक लक्षात ठेवला होता.
दरम्यान, या अपघातापूर्वी साळोबा वस्तीतील ओढ्यावर जगताप याच्या मोटारीने बाळू सखाराम शिंदे यांनाही धडक दिल्याने ते जखमी झाले आहेत. पुढील तपास स्वप्नील लोखंडे करीत आहेत.