
बेशिस्त पार्किंगमुळे यवतला एकाचा मृत्यू
केडगाव, ता. ७ : पुणे-सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्यावर रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत उभी केलेल्या मोटारीला पाठीमागून दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीस्वार ठार झाला. सीताराम श्रीपती गिते (वय ५८, रा. शेळके मळा, यवत, ता. दौंड), असे त्यांचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी (ता. ६) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास झाला. बेशिस्त पार्किंगमुळे हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गिते हे शुक्रवारी रात्री भांडगाव येथे दुचाकीवरून (एमएच४२ बीएच ३०९८) त्यांची मुलगी पल्लवी वैरागे यांना भेटण्यासाठी गेले होते. यवतकडे घरी येत असताना त्यांची दुचाकी सेवा रस्त्यावर भुलेश्वर मार्केटसमोर उभ्या असलेल्या मोटारीला (क्र. एमएच १२ यूडब्ल्यू ६३५०) पाठीमागून धडकली. मोटारीच्या चालकाचा नाव पत्ता समजू शकला नाही. चालकाने वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशी मोटार सेवा रस्त्यावर उभी केली होती. जेथे अपघात झाला, तेथे पार्किंगची व्यवस्था नव्हती. अपघातात गंभीर झाल्याने गिते यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे नेत असताना त्यांचा रस्त्यात मृत्यू झाला. अजय सीताराम गिते यांनी मोटार चालकाविरुद्ध यवत पोलिसांत तक्रार दिली.