भांडी घासून शिकल्याची अनोखी जाण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांडी घासून शिकल्याची अनोखी जाण!
भांडी घासून शिकल्याची अनोखी जाण!

भांडी घासून शिकल्याची अनोखी जाण!

sakal_logo
By

लोगो- युवा दिन विशेष


रमेश वत्रे : सकाळ वृत्तसेवा
केडगाव, ता. ११ : आपण ज्या कठीण परिस्थितीतून आलो, त्याची जाण ठेवली; तर माणूस कितीही मोठा झाला, तरी त्याचे पाय जमिनीवर असतात. याची प्रचिती आली आहे, गलांडवाडी (ता. दौंड) येथील के. ए. खाडे बालकाश्रमाला. बालकाश्रमात वास्तव्य, भैरवनाथ विद्यालयात शिक्षण आणि हॅाटेलच्या मोरीत भांडी घासणाऱ्या युवकाने उतराई म्हणून पै-पै जमा करून बालकाश्रमाला ५० हजार रुपयांची देणगी दिली. अनेकांकडे आज भरपूर आहे, पण दानत नाही. त्यांच्यासाठी हा आदर्श वस्तुपाठच आहे.
संभाजी शिवाजी म्हस्के (वय ३३, रा. एकेरीवाडी, ता. दौंड) असे या युवकाचे नाव आहे. सन १९७२ दुष्काळात माटेगाव (ता. गेवराई, जि. बार्शी) येथून हे कुटुंब पोट भरण्यासाठी दौंड तालुक्यात आले. संभाजी एक वर्षाचा असतानाच वडील वारले. आई आशाबाई या शेतमजुरी करायच्या. घरची परिस्थिती हालाखीची होती. त्यामुळे संभाजी याचे शिक्षण थांबते की काय, अशी परिस्थिती होती. मात्र, त्याच्या सुदैवाने सन २००४ च्या काळात विक्रीकर अधिकारी खंडेराव खाडे यांनी निराधार मुलांसाठी गलांडवाडी येथे बालकाश्रम (वसतिगृह) काढले. त्यातील संभाजी हा पहिला मुलगा होता.
पाचवीत असताना तो बालकाश्रमात आला, तेव्हा त्याला धड लिहिता वाचता येत नव्हते. बालकाश्रमातील संस्कार व भैरवनाथ विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शनामुळे त्याला दहावीत ६८ टक्के गुण मिळाले. अकरावी सायन्सला प्रवेश घेतला. मात्र, बारावीला असताना त्याच्या आईचे निधन झाले. बारावीनंतर त्याला हॅाटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा होता. मात्र, जवळ इतके पैसे नव्हते. खंडेराव खाडे यांची कन्या डॉ. प्रज्ञा भवारी हीने त्याच्या हॅाटेल मॅनेजमेंटचे ५० टक्के शुल्क भरले.
त्याने पार्टटाईममध्ये हॉटेलमध्ये मोरीत भांडी धुतली. कोर्स झाल्यावर पाच वर्षे चिंचवड येथे हॅाटेलमध्ये नोकरी केली. पुण्यात सिंहगड कॅालेजजवळ भाड्याच्या जागेत दूर्वांकुर नावाची खानावळ सुरू केली आहे. त्याने बालकाश्रमाला ५० हजार रुपयांची देणगी दिली. मात्र, त्याचे संबंधितांना आश्चर्य वाटले. कारण, संघर्षमय आयुष्य जगणाऱ्या संभाजी याच्यासाठी ५० हजार रुपये फार मोठी रक्कम आहे.

‘मला फक्त फोन करा’
खाडे बालकाश्रमात गेली २२ वर्षे कोणतीही शासकीय मदत न घेता खंडेराव खाडे हे स्वखर्चाने वसतिगृह चालवतात. त्याची जाण संभाजी याने ठेवली आहे. बालकाश्रमात आल्यावर तो निराधार विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेवत म्हणतो, ‘मुलांनो, तुम्हाला काहीही मदत लागली तर मला फक्त फोन करा.’

बालकाश्रम माझे कुटुंब आहे. मी येथे आलो नसतो; तर शेतमजूरच राहिलो असतो. खाडे दांपत्य माझे आईवडील आहेत. त्यांचे संस्कार ही माझी पुंजी आहे.
- संभाजी म्हस्के