दौंडमध्ये सध्या ‘थंडा थंडा कुल कुल’

दौंडमध्ये सध्या ‘थंडा थंडा कुल कुल’

Published on

रमेश वत्रे : सकाळ वृत्तसेवा
कडेगाव, ता. ३ : अजित पवार यांच्या बंडामुळे तालुक्यातील कुठलाच पक्ष किंवा गट सुखावलेला दिसत नाही. राहुल कुल यांच्या हातातोंडाशी आलेला मंत्रिपदाचा घास हिसकावला जातो की काय, अशी परिस्थिती आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना दिलेली मोकळीक आता मर्यादित होईल. तसेच, जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे महत्त्व वाढत असताना त्याला आता ब्रेक मिळेल, असे दिसते. या प्रकारामुळे कुल यांचे विरोधक सुखावले असले; तरी दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याने कुल यांचे राजकीय स्थान अधिक भक्कम होताना दिसत आहे. ही स्थिती भाजपमधील अनेकांना दिलासादायक वाटत आहे. मंत्रिपद नाही मिळाले तरी चालेल, पण सध्याची राजकीय समीकरणे कुल यांच्या पथ्यावर पडताना दिसत आहे. त्यामुळे वाईटातून चांगले काही तरी घडत आहे, अशी भावना भाजपची आहे.

माजी आमदार रमेश थोरात यांच्यापुढे, ‘आता काय करायचे?’ हा मोठा पेच आहे. त्यांच्यासाठी पुणे जिल्हा बँकेचे संचालकपद हे जीव की प्राण आहे. परंतु, आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर गेले तर त्यांना बँक निवडणुकीत अजित पवार व राहुल कुल या दिग्गजांचा सामना करावा लागेल. तर, अजित पवार यांच्याबरोबर जावे तर ते विधानसभेला कुलांना वगळून थोरातांना उमेदवारी मिळवून देऊ शकत नाही, हे चित्र स्पष्ट आहे. या आधी राष्ट्रवादीतील अनेक जण कुल यांच्याशी छुपे संबंध ठेऊन होते. आता उजळ माथ्याने पुढील वाटचाल होईल, असे दिसते. एकूणच कुल विरोधक बॅकफुटवर गेल्याची चर्चा आहे.

पवार कुटुंबीयांचे कट्टर रमेश थोरात आता काय निर्णय घेतात, याची उत्सुकता आहे. त्यांच्या निर्णयावर कुलांची समीकरणे निश्चित होणार आहेत. दौंड तालुक्यात पक्ष दुय्यम स्थानी आहे. गेली ३३ वर्षे थोरात व कुल या कुटुंबियांभोवती राजकारण फिरत आहे. दौंड तालुक्यात पक्ष निश्चित नसले; तरी कुल व थोरात यांचा पुन्हा विधानसभेला पारंपरिक सामना रंगेल, असाही एक मत प्रवाह आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.