सामाजिक, आध्यात्मिक संघटन ः श्री. दत्त सेवा मंडळ

सामाजिक, आध्यात्मिक संघटन ः श्री. दत्त सेवा मंडळ

बोरीपार्धीतील श्री. दत्त सेवा मंडळ अध्यात्माबरोबरच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे. याची प्रचिती पंचक्रोशीतील अनेकांनी घेतली आहे. नावाप्रमाणे या मंडळात सेवाभाव पुरेपूर भरला आहे. मंडळातील प्रत्येकजण आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून भाविक भक्त व ग्रामस्थांना सेवा देत आहेत. अखंड हरिनाम सप्ताह, ग्राम स्वच्छता अभियान, एक दिवस तरी वारी अनुभवावी, तीर्थयात्रा दर्शन, दिवाळी पाडवा संगीत महोत्सव, गरजू विद्यार्थ्यांना मदत असे अनेक उपक्रम तालुक्यातील घराघरांत जावेत यासाठी हा लेखन प्रपंच.


बोरीपार्धीतील दत्त मंदिर हे साठ वर्षांपूर्वी उभारण्यात आले. गावातील तरुणांना एकत्र येण्यासाठी दत्त मंदिर हे एक निमित्त झाले. तरुण एकत्र आले अन् सामाजिक कामे होत गेली. गावातील पोलिस हवलदार मल्हारी सोडनवर यांनी या तरुणांना एकत्र करून दत्त सेवा मंडळाला एक नवं रूप दिलं. पोलिस दलात असूनही सामाजिक कार्यातील त्यांची आवड वाखाणण्याजोगी आहे. स्वरसाधना भजनसंध्याच्या माध्यमातून हे मंडळ महाराष्ट्रातील अनेक गावात पोहचले आहे. मल्हारी सोडनवर यांच्या सुमधूर आवाजामुळे ते भक्तांच्या पसंतीस उतरले आहे. या भजन समुहाला विविध गावातून चांगली मागणी असते.

‘एक दिवस तरी वारी’
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दिंडीत दत्त सेवा मंडळ सहभागी असते. अनेकांना वारी करायची इच्छा असते मात्र व्यवसाय, नोकरीमुळे ते शक्य होत नाही. २०२३च्या पालखी सोहळ्यात मंडळाने इच्छुकांसाठी ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ असा उपक्रम हाती घेतला अन् त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

बाल संस्कार शिबिर
लहान वयातच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत या हेतूने बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येते. यात आध्यात्मिक ज्ञान, स्वीमिंग, ट्रेकिंग, साहसी खेळ, योगा, प्राणायाम, करिअर डेव्हलपमेंट ते पालकांची पाद्यपूजा करण्यापर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येतात.

सहस्त्रचंद्र सोहळ्यातून ज्येष्ठांचा सन्मान
साधारणपणे सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा हा खर्चिक असल्याने तो श्रीमंतांचा कार्यक्रम बनला आहे. मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबात हा सोहळा इच्छा असूनही अनेकांना करता येत नाही. हाच धागा पकडत दत्त सेवा मंडळाने १०० ज्येष्ठ नागरिकांचा मोफत सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा घडवून आणला. ज्येष्ठांची व त्यांच्या कुटुंबियांची इच्छापुर्ती झाल्याने त्यांच्या चेहऱ्यांवरील समाधान ओसंडून वाहत होते.

अखंड हरिनाम सप्ताह
मल्हारीदादा सोडनवर यांच्या मार्गदर्शनाखाली बोरीपार्धी गावात दत्त जयंतीला अखंड हरिनाम सप्ताहाचे उत्कृष्ठ आयोजन मंडळाकडून केले जाते. या सप्ताहाची ग्रामस्थ वाट पाहत असतात. महाराष्ट्रातील दिग्गज किर्तनकारांनी येथे सेवा दिली आहे. मंडळाकडून अनेक संतांची व महापुरूषांची जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते. गावात रामकथा व भागवतकथेचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळी पहाटेला ग्रामस्थांना संगीताची मेजवानी दिली जाते.

उत्तम आरोग्यासाठी धडपड
मंडळाने कोरोनाकाळात ग्रामस्थांना मोफत रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली होती. गरजू ग्रामस्थांसाठी मंडळाने मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच योगासन शिबिराचे आयोजन केले आहे.

वृक्षारोपण व संवर्धन
मंडळाने गावात विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केले आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये ग्रामस्थांना मोफत पाण्याचे टँकर पुरवले जातात. अर्थात हे सर्व उपक्रम मंडळाला मिळणारे मानधन, मंडळाचा फंड व देणगीदारांमुळे चालू आहेत. मंडळाने ग्रामस्थ व देणगीदारांचे मनापासून आभार मानले आहेत.

दत्त सेवा मंडळाची कार्यकारिणी ः
अध्यक्ष-बंडू नेवसे, उपाध्यक्ष-प्रशांत ताडगे, कार्याध्यक्ष-महेश सोडनवर, संदिप चव्हाण, खजिनदार-दशरथ दिवेकर, निलेश ताडगे, सचिव-दत्ता नेवसे, गोरख मांडगे, संघटक-संदिप सोडनवर, सोशल मिडीया-संतोष सोडनवर, सल्लागार-मिलींद टेंगले, दिलीप साळुंके, मार्गदर्शक-मल्हारी सोडनवर, सतीश सोडनवर, अशोक अडसूळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com