अगरवाल कुटुंबियांकडून वारकऱ्यांची सेवा

अगरवाल कुटुंबियांकडून वारकऱ्यांची सेवा

केडगाव, ता. ६ : मनात भक्तीचा, सेवेचा भाव असेल तर जात, धर्म, प्रांत, पंथ यांच्या भिंती गळून पडतात. अन् तेथे उरतो फक्त सेवेचा भाव. सेवेतून समाधान मिळते, ते मनाला ऊर्जा देते. हे समाधान मिळविण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. ‘कशाला जाऊ दूर; इथेच माझे पंढरपूर’ अशी भावना मनात ठेवत केडगावातील अगरवाल कुटुंब १५ वर्षे वारकऱ्यांची सेवा करत आहे.
उत्तरप्रदेश मधील आग्रा जिल्ह्यातील पवनकुमार अगरवाल यांचे कुटुंब प्रारंभी परळी वैजनाथ येथे आले. सध्या ते सोरतापवाडी येथे राहत असून त्यांचा केडगावातील (ता. दौंड) महामार्गालगत त्यांचा कोळसा विक्रीचा व्यवसाय आहे. अगरवाल यांच्या घराण्यात संतांची परंपरा आहे. त्यातूनच सेवेची ही परंपरा सुरू झाली आहे. किरोडीलाल अगरवाल हे संत होते. ते २० वर्षांपूर्वी वारकऱ्यांना चहा वाटपातून सेवा करत होते.
१५ वर्षांपूर्वीपासून पाहेगाव (जि. जालना) येथील जोगेश्वरी माता दिंडीतील २५० वारकऱ्यांना ते पंचपक्वान्नाचे जेवण देत आहेत. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहूतून निघाल्यानंतर अगरवाल कुटुंबीयांना सेवेचे वेध लागतात. दिंडी प्रमुखांशी चर्चा करून मेनू ठरतात आणि तयारीला सुरुवात होते. पालखी सोहळा यवत येथून वरवंडच्या दिशेने जात असताना दिंडीचे अगरवाल यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी मनोभावे स्वागत होते. यावेळी संपूर्ण अगरवाल कुटुंब वारकऱ्यांच्या सेवेत दंग असते. पवनकुमार अगरवाल, सुनीता अगरवाल, मुकेश अगरवाल, अंजना अगरवाल स्वयंपाक बनविण्यात विविध प्रकारची मदत करतात.

अगरवाल कुटुंबात सेवाभाव ओतप्रोत भरलेला आहे. दरवर्षी जेवणासाठी लागेल ते साहित्य भेट देतात. जेवणात दरवर्षी पदार्थ बदलले असतात. वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी त्यांच्या जागेत पत्रा शेड बनवले आहे.
शोभा गावंडे, दिंडी प्रमुख

सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. सेवेचा आनंद शब्दात वर्णन करता येत नाही. यापेक्षा मोठा आनंद नाही. इथेच देव भेटल्याचे समाधान आम्ही अनुभवतो. आम्ही थोडे देतो परंतु वारकऱ्यांना ते आभाळा एवढे वाटते.
पवनकुमार अगरवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com