तुमच्या वादात तालुक्याचे नुकसान
केडगाव, ता. २९ : सहकारी साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा या ताळेबंदातील त्रुटींवर गाजत असतात. विरोधक वार्षिक अहवाल- ताळेबंदाचा बारीक अभ्यास करून सभेला येतात. एरवी एकमेकांचे तोंड न पाहणाऱ्या विरोधकांना वार्षिक सभा ही एक नामी संधी असते. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले जाते. सभेत ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होताना सभासदांना पाहायला मिळते. मात्र, ‘भीमा पाटस’च्या सभेत यापैकी काहीच घडले नाही. या सभेतून सभासदांच्या पदरात काय पडले, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला.
‘भीमा पाटस’चे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. २८) वार्षिक सभा झाली. कुल व त्यांचे समर्थक सभेत बोलताना अडथळे आणतात. बोलू देत नाही, या कारणामुळे अनेकजण सभेकडे पाठ फिरवतात. मात्र कालच्या सभेत हा अनुभव आला नाही. उलट जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांना व्यवस्थित प्रश्न मांडतायावेत यासाठी कुल यांनी त्यांच्या समर्थकांना शांत करत त्यांचे माईक बंद केले. कुल-थोरात यांच्यात ‘तू तू- मै मै’ झाली, पण त्यात टोकाचा विरोध नव्हता. दोघांनी एकमेकांना कोपरखळ्या मारल्या. थोरात यांनी ताळेबंदाचा आधार घेत जळालेल्या साखरेचा प्रश्न उपस्थितीत केला.
कारखान्याच्या सभेत नेहमी कुल यांना कोंडीत पकडणारे शेतकरी संघटनेचे शिवाजी नांदखिले, वासुदेव काळे, नामदेव ताकवणे, नानासाहेब जेधे, अरविंद गायकवाड, राजाराम तांबे, तात्या ताम्हाणे, राजेंद्र कदम यांची अनुपस्थिती जाणवली.
सभा दोन तास चालली, परंतु त्यातील बहुतांश वेळ हा रमेश थोरात व वैशाली नागवडे यांनी घेतला. सभा अधिक वेळ न चालल्याने वसंत साळुंखे, हनुमंत वाबळे, पोळ, विठ्ठल दिवेकर, रामदास दोरगे, नितीन म्हेत्रे आदी अनेक सभासदांना बोलता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा एकही पदाधिकारी सभेला हजर नव्हता.
‘सभासदांना बोलू द्या’
सभेत कुल-थोरात यांची लांबलचक प्रश्न उत्तरे ऐकून विठ्ठल दिवेकर उठले अन् म्हणाले, ‘तुमच्या वादात तालुक्याचे नुकसान होत आहे. कारखान्याच्या प्रश्नांवर बोला.’ वैशाली नागवडे म्हणाल्या, ‘तुम्ही दोघे (कुल, थोरात) नंतर एकत्र बसा, पण आता सभासदांना बोलू द्या.’ तर, कुल यांच्या लांबलचक उत्तरांमुळे थोरात यांना जास्त वेळ ताटकळत उभे राहावे लागले.
सभेत ऊसदराबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. सभा अधिक वेळ चालायला पाहिजे होती. त्यामुळे या सभेतून सभासदांच्या पदरात काय पडले, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
- वसंत साळुंखे, सभासद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.