दारूगोळ्याने भरलेल्या मालगाडीचा घडविला अपघात
रमेश वत्रे : सकाळ वृत्तसेवा
केडगाव, ता. १४ : भारत-पाकच्या १९७१ मधील युद्धात भारतावर हल्ला करण्यासाठी दारूगोळा, हत्याराने भरलेली रेल्वे लाहोरकडे जाणार होती. युद्ध सुरू असताना पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन ही मालगाडी मध्येच अडविण्याची जबाबदारी एका उमद्या मराठी सैन्य अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली. या अधिकाऱ्याने जिवाची बाजी लावत मोहीम फत्ते केली. रेल्वेचा अपघात घडविण्यात आला. पाकिस्तानी लष्करात हाहाकार माजला. रसद थांबली अन् युद्धही थांबले.
हा पराक्रम सांगत होते ९० वर्षीय कर्नल सदानंद साळुंके (निवृत्त). भारत पाकिस्तानचे १९७१ चे युद्ध अवघ्या १३ दिवसांत संपले. भारतीय सैन्याच्या पराक्रमामुळे पाकचे ९० हजार सैनिक शरण आले. ते अशाच योद्ध्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे. सैन्यदिनामुळे साळुंके यांनी त्यांच्या पराक्रमाला उजाळा दिला. साळुंके यांचे मूळ गाव धुळे. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. मॅाडर्न महाविद्यालयात ते वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते नोकरी करत होते. १९६२ भारत - चीन युद्धानंतर अनेक तरुण सैन्यात भरती होऊ लागले. साळुंके हे सुद्धा घरी न सांगता लष्करात भरती झाले. ते भरती झाल्याने त्यांची आई रडू लागली. वडिलांनी आईची समजूत घातली. वडील त्यांना म्हणाले, कुठे जायचे तिकडे जा. पण नाव खराब करू नको. साळुंके यांनी डिसेंबर १९६२ मध्ये सैन्यात कमिशन्ड अधिकारी म्हणून प्रवेश घेतला. त्याकाळी महाविद्यालयातील चांगल्या पगाराची, सुखाची नोकरी सोडून सैन्यात भरती होणे हा इतरांच्या दृष्टीने वेडेपणाच होता. पण वेडेच इतिहास घडवतात या उक्तीप्रमाणे साळुंके यांनी पण इतिहास घडविला.
साळुंके १९६५ मध्ये दोन महिन्यांची सुटी टाकून पुण्यात आले. परंतु घरी आल्यानंतर १५ दिवसांत भारत-पाक युद्ध सुरू झाले. रेडिओवर घोषणा करण्यात आली. की युद्ध सुरू झाले असून सुटीवर गेलेल्या सैनिकांनी तातडीने हजर व्हावे. साळुंके हे सर्वात आधी सीमेवर पोचलेले जवान ठरले. यासाठी तत्कालीन जनरल सॅम माणेकशा यांनी त्यांची पाठ थोपटली होती.
त्रिपुराच्या सीमेवर १९६५ मध्ये भारत-पाक युद्ध झाले. त्यातही साळुंके यांनी भाग घेतला. पण तेव्हा साळुंके हे अभियांत्रिकी विभागात होते. साळुंके यांना फ्रंटवर शत्रुशी लढायचे होते. त्यामुळे त्यांनी मराठा लाईट इंफन्ट्री हा विभाग मागून घेतला. १९७१ च्या भारत पाक युद्धात ५५ सैनिकांना घेऊन साळुंके पंजाब सरहद्दीवरील नुरपुरा या गावी पोहचले. सरकंटा मध्ये (झाडी) लपून बसलेल्या पाक सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला. भारतीय सैनिकांच्या पथकाने गोळीबार केला. या धुमश्चक्रीत तीन भारतीय सैन्य मारले गेले. दारूगोळ्याने भरलेली रेल्वे मालगाडीला घातपात करण्याची महत्त्वाची जबाबदारी सदानंद साळुंके यांच्यावर होती. साळुंके यांनी १४ डिसेंबर १९७१ च्या मध्यरात्री नूरकोट ते सियालकोट दरम्यान रेल्वेचा घातपात घडवून आणला. साळुंके व त्यांच्या सहकार्यांनी पाकिस्तानमध्ये १२ ते १३ किलोमीटर आत जाऊन हा घातपात घडवला होता. रेल्वे रूळाखालील फिसप्लेट काढणे, रूळावर मोठे दगड व झाडाचे ओंडके टाकण्यात आली. यामुळे रेल्वे रूळावरून घसरून खाली गेली. या पराक्रमामुळे पाकिस्तानी सैन्याची रसद बंद झाली होती. पंजाबमधील नूरपुरा गावातील लोकांनी गावाचे नाव तेव्हापासून वीरपुरा असे बदलले.
जयपूरमधील रस्त्याला साळुंके यांचे नाव
जयपूरमधील एका रस्त्याला सदानंद साळुंके यांचे नाव देण्यात आले आहे. या सर्व मोहिमेत ५५ मधील १२ जवान शहीद झाले होते. या कर्तबगारीसाठी साळुंके यांना तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते वीर चक्र सन्मान बहाल करण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे कौतुक केले होते.
पुण्यात हत्तीवरून मिरवणूक
साळुंके यांचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर, साहित्यिक ग. दि. माडगूळकर, ‘सकाळ’चे संस्थापक संपादक नानासाहेब परूळेकर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी यांच्या हस्ते सन्मान झाला होता. ग.दि. माडगूळकर यांनी साळुंके यांची पुण्यात हत्तीवरून मिरवणूक काढली. ते १९८९ मध्ये सेवानिवृत्त झाले. पुणे शहरातील विविध सामाजिक संघटनांशी आजही साळुंके यांचा सक्रिय सहभाग आहे. दरम्यान, साळुंके यांना राज्य सरकारने महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.
---
04143, 04144, 04145
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

