निमगाव केतकीमधून स्वामींच्या पालखीचे अक्कलकोटकडे प्रस्थान
निमगाव केतकी, ता. ४ : इंदापूर तालुका श्री स्वामी समर्थ सेवा संघाचा निमगाव केतकी ते अक्कलकोट हा पायी पालखी सोहळा निमगाव केतकी येथून टाळ मृदंगाच्या गजरात आणि स्वामी समर्थांच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात मार्गस्थ झाला.
श्री संत तुकाराम महाराज पालखी तळावर पूजापाठ आणि आरती झाल्यानंतर स्वामी समर्थांचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. पालखी रथाला बैलजोडी असून पुढे तुतारीवाले, भजनीमंडळ, घोडा, चौघडा आहे. सुवर्णयुग गणेश मंदिराजवळ सोहळ्याचे स्वागत सुवर्णयुग ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे, भीमराव बोराटे, ॲड. दिलीप पाटील, अर्जुन घाडगे यांनी तर संत सावतामाळी चौकात राजू भोंग, बबन खराडे, तुषार खराडे, विक्रम जगताप यांनी केले.
पालखी सोहळा प्रमुख हनुमंत काळे म्हणाले, ‘‘स्वामी समर्थाच्या पायी पालखी सोहळ्याचे हे पहिले वर्ष आहे. या सोहळ्यात तालुक्यातील ४८ गावातील सुमारे एक हजार महिला व पुरुष सहभागी आहेत. प्रत्येकाच्या हातात भगवा पताका, गळ्यात भगवा शेला, भगवी टोपी आणि संघाचा बॅच असा पेहराव आहे. निमगाव ते अक्कलकोट हे १६५ किलोमीटर अंतर असून वाटेत सात मुक्काम होणार आहेत. पहिल्या वर्षी भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.