सातारा रस्ता परिसरातील उद्योजक गुंडगिरीने त्रासले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा रस्ता परिसरातील उद्योजक गुंडगिरीने त्रासले
सातारा रस्ता परिसरातील उद्योजक गुंडगिरीने त्रासले

सातारा रस्ता परिसरातील उद्योजक गुंडगिरीने त्रासले

sakal_logo
By

खेड शिवापूर, ता. २३ : पुणे-सातारा रस्त्यालगत असलेल्या औद्योगिक पट्ट्यातील अनेक उद्योजक आणि व्यावसायिक काही स्थानिकांकडून होणाऱ्या उपद्रवामुळे त्रस्त झाले आहेत. कंपनी चालकांकडून खंडणी मागणे, कंपनीतील भंगार मिळविण्यासाठी दमदाटी करणे, कामगारांना रस्त्यात अडवून पैसे घेणे, मारहाण करणे, या प्रकारांनी येथील उद्योजक आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. अखेर या त्रासातून सुटका होण्यासाठी या उद्योजकांनी थेट पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
पुणे-सातारा रस्त्यालगत असलेल्या वेळू, कासुर्डी खे.बा. या गावात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक पट्टा आहे. या भागात अनेक लहान-मोठे व्यावसायिक आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही स्थानिकांच्या दहशतीने येथील उद्योजक आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या भागातील काही उपद्रवी स्थानिकांकडून उद्योजकांना खंडणी मागणे, कंपनीतील भंगार मिळविण्यासाठी दमदाटी करणे, कामगारांना रात्री-अपरात्री रस्त्यात अडवून मारहाण करणे, त्यांच्याकडून पैसे उकळणे, असे प्रकार होत आहेत. अनेकदा त्याबाबत तक्रार केल्यास आपल्याला त्रास होईल, या भीतीने अनेक व्यावसायिक त्यांच्याविरोधात थेट तक्रार करत नाहीत. त्याचा फायदा घेत या उपद्रवी लोकांचा त्रास वाढू लागला आहे. स्थानिक पोलिसांना सांगूनही त्यात फरक पडत नसल्याने अखेर या त्रस्त व्यावसायिकांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांना याबाबत थेट निवेदन दिले.

‘पोलिसांकडून मिटवामिटवी’
‘‘आम्हाला गेल्या अनेक दिवसांपासून काही स्थानिकांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. अलीकडच्या काळात त्यांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिक येथून स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्यास कायम मिटवामिटवी केली जाते. मात्र, तरीही त्यांचा उपद्रव थांबलेला नाही. त्यामुळे आम्ही पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांना निवेदन दिले आहे,’’ अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर काही व्यावसायिकांनी दिली.

कंपनी चालकांना त्रास देणे, खंडणी मागणे हे प्रकार चुकीचे आहेत. असे प्रकार होऊ नयेत, अशा सक्त सूचना आमच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. असे काही चुकीचे प्रकार होत असतील; तर त्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल.
- अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक