गोळीबार करत रोकड लुटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोळीबार करत रोकड लुटली
गोळीबार करत रोकड लुटली

गोळीबार करत रोकड लुटली

sakal_logo
By

खेड-शिवापूर, ता. २० : दारू दुकानातील दारू विक्रीची रक्कम घेऊन निघालेल्या कामगारांवर दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांनी गोळीबार करून त्यांच्याकडील सुमारे पावणेचार लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. पुणे-सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर येथे रविवारी (ता. १९) मध्यरात्री पावणेबारा वाजता हा प्रकार घडला. सुदैवाने गोळीबार हवेत झाल्याने कोणाला दुखापत वगैरे झाली नाही.
याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली की, पुणे-सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर गावच्या हद्दीत सोनल वाईन्स हे दारूचे दुकान आहे. या दुकानातील जमा झालेली दारू विक्रीची रक्कम घेऊन रविवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास दीपक जगदाळे आणि काळेश्वर आगारीया हे दोघे जण दुचाकीवरून कोंडे देशमुख पेट्रोल पंपावर निघाले होते. यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांनी दुचाकीने जगदाळे यांच्या दुचाकीला घासून खाली पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी जगदाळे आणि आगारीया यांनी त्यांना विरोध केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कोणाला दुखापत झाली नाही. मात्र, जगदाळे आणि आगारीया यांच्याकडील सुमारे पावणेचार लाख रुपये रक्कम असलेली पिशवी घेऊन ते चोरटे पसार झाले. या प्रकरणी राजगड पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, ‘‘सुदैवाने एक गोळीबार चुकला आणि दुसरा गोळीबार हवेत झाला. त्यामुळे कोणाला दुखापत झाली नाही. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे.’’

सहा महिन्यात पाच गंभीर गुन्हे
शिवापूर येथे सुमारे सहा महिन्यांपूर्वी सोन्याच्या दुकानावर दरोडा पडला. त्यानंतर वेळू येथील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडले. दोन महिन्यांपूर्वी वेळू येथील पेट्रोल पंपावर दरोडा पडला. आठ दिवसांपूर्वी वेळू येथील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. तर, रविवारी गोळीबार करून पावणेचार लाखांची रोकड लंपास केली. गेल्या सहा महिन्यात वरील पाच गंभीर गुन्हे राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.