माले परिसरात पशूधन लसीकरणापासून वंचित
कोळवण, ता. १९ : मुळशी तालुक्यातील माले, संभवे, मुळशी व गोणवडी या गावांत पशुधन विभागाचे वतीने शेतकऱ्यांच्या पशुधनास आवश्यक असणारे लाळ्या खुरकूत तसेच विविध विषाणुजन्य आजार प्रतिबंधात्मक लसीकरण मागील वर्षभरापासून झालेले नाही. यामुळे
पाच दुभत्या गाई लाळ्या खुरकूत व अन्य आजार होऊन दगावल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे शेतकरी नाना पासलकर यांनी सांगितले.
पशुवैद्यकीय पर्यवेक्षक उपलब्ध होत नाहीत त्यामुळे येथील पशुधनपालकांना खासगी डॉक्टरांकडून जनावरांवर उपचार करण्याची वेळ आली आहे यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. काही वेळा जनावरांवर जुने गावठी घरगुती उपचार करून घ्यावे लागत आहेत. एक म्हशीला ताप आल्याने तिचे डोळे गेले आहेत, असे एका शेतकऱ्याने सांगितले.
मागील सहा ऑगस्टपासून पौड येथील पशुधन अधिकारी यांना संपर्क साधून जनावरांच्या आजारांची कल्पना दिली होती. परंतु त्यांच्याकडून तुमचा भाग राज्य सरकारच्या पशुधन विभागाचे अंतर्गत येतो, असे सांगितले.
माझ्याकडे माले व कोंढावळे येथील अतिरिक्त पदभार आहे व काम करायला मी एकटाच आहे, असे माले, कोंढावळे गावांचा अतिरिक्त भर असलेले पशुधन पर्यवेक्षक गहिनीनाथ बढे यांनी सांगितले.
कोळवण, कुळे, अंबडवेट, उरवडे, कोळावडे येथील जागा भरल्या असून तेथे पशुधन पर्यवेक्षक कार्यरत आहेत. रिहे, भूगाव, माले, कोंढावळे येथील दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक जागा रिक्त आहेत व अतिरिक्त पदभार दुसऱ्या पशुधन पर्यवेक्षक यांच्याकडे आहे.
या शेतकऱ्यांची दगावली जनावरे
१. नाना पासलकर यांच्या चार गायी लाळ्या खुरकूतने दगावल्या.
२. प्रकाश झोरे यांची गाय लाळ्या खुरकूतने दगावली.
३. राजेंद्र ढमाले यांच्या म्हशीचे तापाने डोळे गेले
आमची जनावरे चार दिवसांपूर्वी दगावली. याबाबत पौड येथील डॉक्टरांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. आमची जनावरे दगावली आहेत.याला जबाबदार कोण?
- नाना पासलकर, पशुधनाचे पालक, माले (ता. मुळशी)
संबंधित शेतकऱ्याच्या घरी पशुधनावर उपचार करण्यासाठी आमचे पथक गेले होते. त्यांनी या पथकाकडून त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेतले नाहीत. जनावरे दगावली तर त्यांची रीतसर मृत्यू पश्चात वैद्यकीय तपासणी करून घ्यायला हवी होती. उद्या मी माले येथे जाणार आहे.
- सोनल हिंगाडे, पशुधन अधिकारी, पौड
येत्या आठ दिवसांत लाळ्या खुरकूत लस उपलब्ध करून लसीकरण सुरू करणार आहे. तोपर्यंत तेथील डॉक्टरांना परिस्थितीचा आढावा घ्यायला सांगितला आहे. परराज्यातून व्यापारी व दूध उत्पादक शेतकरी दुधाळ जनावरांना घेऊन आपल्या इकडे येतात. त्यांना हे प्रतिबंधात्मक लसीकरण केले नसेल तर त्यामुळेसुद्धा लाळ्या खुरकूत हा रोग होतो. पावसाळ्यात जनावरांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते.
- बाळासाहेब गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, औंध
02373
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.