कोळवण खोऱ्यातील गावागावांत काकड आरतीचा उत्साह
कोळवण, ता. १२ : कोळवण (ता. मुळशी) खोऱ्यातील काशिग, हाडशी वाळेण, भालगुडी, कोळवण, डोंगरगाव, डोंगरगाव खालचीवाडी, होतले, नाणेगाव, सावरगाव, करमोळी, चाले, दखणे, मुगावडे, साठेसाई, नांदगाव, चिखलगाव या गावांमधील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच काकड आरतीचे मंगलमय सूर कानी पडत आहेत.
गावातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी आणि त्यांना तरुणांची असणारी साथ हे एकत्र जमून पांडुरंगाचा काकडा पहाटे पाच वाजताच सुरू करतात. गावातील युवक-युवती, सुवासिनी घरून देवाला औक्षण करण्यासाठी हातामध्ये आरतीचे तबक घेऊन मंदिरात येतात. काकडा भजनाच्या सुरुवातीला देवाच्या रूपाचे अभंग म्हटले जातात. यामध्ये एकूण सात मालिका गायिल्या जातात. त्यात मंगलाचरणाचा भाग एक, दोन, तीन, काकडा आरती, अभंग, भूपाळ्या, वासुदेव, जोगी, आंधळे पांगुळ, बहिरा मुका, नाट गौळणी असा नित्यक्रम गुरुवर्य हैबतबाबा आरफाळकर यांनी घालून दिलेला आहे. तो वारकरी नित्यनेमाने आजही पाळतात.
दही, दूध, मध, साखर यांनी अभिषेक करून देवांना उष्ण पाण्याने स्नान घातले जाते. देवाला पोशाख परिधान केल्यानंतर अलंकार पूजा आणि हार अर्पण केले जातात. नंतर पेढे, सुकामेवा, विविध फळे, दूध दही मिश्रीत लाही, साखर फुटाणे, पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविल्यानंतर आरती आणि पसायदान होत असल्याची माहिती मुळशी तालुका वारकरी संप्रदाय समाज दिंडी क्रमांक ९६ चे विणेकरी अंकुश महाराज साठे यांनी दिली. यावेळी साठेसाईचे ज्येष्ठ कीर्तनकार मारुती महाराज साठे, शिवाजी महाराज साठे, तुकाराम महाराज साठे, काशिनाथ महाराज साठे, सोमनाथ महाराज साठे, हरिभाऊ महाराज धिडे, सुभाष महाराज धिडे, नवनाथ महाराज माझिरे, सोपान महाराज सावंत, सहादू टेमघरे, दत्तात्रेय महाराज साठे, तान्हुबुवा दुर्गे, शंकर दुर्गे, धर्मा फाले, भाऊसाहेब महाराज साठे, देवराम महाराज फाले उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.