धनवेवाडीतील रस्त्याच्याकडेला औषधांचा ढीग

धनवेवाडीतील रस्त्याच्याकडेला औषधांचा ढीग

Published on

कोळवण, ता. २२ ः पुणे- ताम्हिणी- कोलाड या महामार्गालगत धनवेवाडी (ता. मुळशी) येथील वळणावर गटाराच्या शेजारच्या मोकळ्या जागेत औषधांच्या गोळ्यांनी भरलेली पाकिटे मोठ्या प्रमाणात उघड्यावर टाकली आहेत. त्यामुळे येथील जनावरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
या ठिकाणी टाकलेल्या काही औषधांच्या गोळ्यांची भरलेली पाकिटे जाळून टाकली आहेत. यामध्ये असलेल्या औषधी गोळ्या या महाग असून, काही औषधी गोळ्यांची वापराची मुदत संपली आहे. परंतु, काही औषधी गोळ्यांची वापराची मुदत ही मे २०२७ असून, यामध्ये असलेल्या एकाच पाकिटाची किंमत २०० ते ४०० रुपये आहे. इतकी महाग औषधी गोळ्यांनी भरलेली पाकिटे उघड्यावर टाकलेल्या अवस्थेत असलेली आढळून आली असताना ती येथे कोणी टाकली? याबाबत माहिती नाही. ही औषधांनी भरलेली गोळ्यांची पाकिटे खासगी डॉक्टरांकडून अथवा मेडिकल दुकानदारांकडून टाकली गेली असावीत, असा संशय व्यक्त होत आहे. कारण शासकीय दवाखान्यात वापरात असलेल्या औषधी गोळ्यांनी भरलेल्या पाकिटावर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, नॉट फॉर सेल, असे स्पष्ट अक्षरात लिहून आलेले असते व त्यावर किंमत नसते. अशी बिनदिक्कतपणे उघड्यावर टाकलेल्या औषधी गोळ्या एखाद्या व्यक्तीच्या हाती पडल्या अथवा एखाद्या जनावराने खाल्ल्या तर वैद्यकीय संकट उभे राहू शकते. अशा गंभीर घटनेकडे संबंधित आरोग्य विभागाने लक्ष द्यायला हवे.

औषधांनी भरलेली गोळ्यांची पाकिटे आमच्या शासकीय दवाखान्यातील नाहीत. ती खासगी डॉक्टरांकडून अथवा मेडिकल दुकानदारांकडून टाकली गेली असावीत. अशी औषधे उघड्यावर टाकून द्यायची नसतात. औषधांची मुदत संपली तर ती नष्ट करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून ती नष्ट करायची असतात.
- डॉ. मीना इसवे, वैद्यकीय अधिक्षक, पौड

कालबाह्य औषध नष्ट करण्याची पद्धत
नियमानुसार मुदत संपलेल्या गोळ्या असतील तर त्यांची पावडर करून ती एका ठराविक जमिनीत घेतलेल्या खड्ड्यात टाकून पुरायची असते. तसेच, पातळ औषध असल्यास एका बकेटमध्ये एकत्र ओतून तेही जमिनीत एका खड्ड्यात टाकून हा खड्डा बंद करायचा असतो.

02784

Marathi News Esakal
www.esakal.com