हौशी ३५ नवकवींची पहिली प्रतिभाप्रस्तुती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हौशी ३५ नवकवींची पहिली प्रतिभाप्रस्तुती
हौशी ३५ नवकवींची पहिली प्रतिभाप्रस्तुती

हौशी ३५ नवकवींची पहिली प्रतिभाप्रस्तुती

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. ७ ः कोरोना काळातही स्वत:तील प्रतिभा जागृतीसाठी धडपडणाऱ्या शेकडो नवकवींनी ज्येष्ठ साहित्यिक राजन लाखे यांचे ऑनलाइन प्रशिक्षण घेतले. अर्थात यातील तब्बल ३५ जण एकत्र आले आणि स्वत:तील तब्बल १७५ पद्यप्रस्तुती अभिव्यक्त होत त्यांनी ‘वाचे बरवे कवित्व’ हा कविता संग्रहही नुकताच प्रकाशित केला.

नुकत्याच पार पडलेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात या काव्यसंग्रहाचे प्रकाशन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते व प्रसिद्ध कादंबरीकार, लेखक रवींद्र शोभणे यांच्या हस्ते पार पडले. विशेष म्हणजे यातील नीलेश खडके व पल्लवी पुरवंत (भुजबळ) हे दोन कवी पुणे जिल्ह्यातील बारामती आणि जुन्नर तालुक्यातील आहेत.

कोरोनाकाळ म्हणजे सर्वक्षेत्री जिज्ञासूंसाठी ऑनलाइन प्रशिक्षणाचा पर्वकाळ होता. याच काळात विश्व मराठी परिषदेच्या वतीने ऑनलाइन कविता कार्यशाळा घेण्याची माहिती सोशल मिडीयात झळकली आणि अनेक हौशी नवकवींना या कार्यशाळेत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. याच निमित्ताने ऑनलाइन एकत्र झालेले व एक व्हॉट्सअप कवीग्रुप करुन आपल्या कविता शेअर करीत काही नवोदित लिहिते झाले. यातूनच एकत्रित कविता संग्रहाची कल्पना पुढे आली. या कल्पनेवर काम होताना संकलन, संपादन, एकत्रीकरण आणि त्याचा एकत्रित काव्यसंग्रह प्रकाशन या सर्वांचा निर्णयही ऑनलाइनच झाला. पुढे प्रत्यक्षात काम सुरू झाले आणि बंगळूरसारख्या मेट्रो सिटीसह पुणे शहर-जिल्हा ते संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक भागातील नवकवी यात सहभागी झाले अन् ‘वाचे बरवे कवित्व’ हा कवितासंग्रह प्रत्यक्षात आला.

दरम्यान, या संपूर्ण कविता संग्रहाचे संकलन, संपादन व प्रस्तावना निखिल सावरकर यांनी केली असून, यात आध्यात्मिक, पर्यावरण, माणसांच्या भाव-भावना, स्त्रीमनाचे विविध पैलू, हिमालय ते निसर्ग-शेताची हिरवाई असे सगळेच विषय नवकवींनी अत्यंत उत्तम भाषेत मांडले आहेत. यातील ११ कवी पुण्यातले, दोन कवी पुणे ग्रामिण (नारायणगाव, ता. जुन्नर व लिंबोडी, ता. बारामती) येथील असून उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रासह नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यातून मराठी साहित्यावर प्रेम करणारे नवकवी असल्याची माहिती कवयित्री पल्लवी पुरवंत यांनी दिली.
-------------------